बेशिस्त औरंगाबादकर; लाखो रुपयांचा दंड भरू; पण झेब्रा क्रॉसिंगवरच उभे राहू !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 01:30 PM2022-04-19T13:30:45+5:302022-04-19T13:31:57+5:30
वाहतूक पोलिसांनी वर्षभरात तब्बल जम्पिंग सिग्नल प्रकारात ४५ हजार ५२९ नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
- राम शिनगारे
औरंगाबाद : स्मार्ट सिटी म्हणून औरंगाबादचा देशभरात डंका वाजविण्याचे काम करण्यात येत आहे. स्मार्ट सिटीमध्ये प्रत्येक गोष्ट स्मार्ट असते; पण औरंगाबाद त्यास अपवाद असल्याचे 'लोकमत'च्या पाहणीत आढळून आले. शहरातील काही अपवाद वगळता बहुतांश रस्ते, सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंगच नसल्याची माहिती समोर आली आहे. ज्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग आहे, त्या ठिकाणी बेशिस्त औरंगाबादकर नियम पाळत नसल्याचेही दिसून आले.
...अबब! वर्षभरात १ कोटी दंड भरला..
शहर पोलिसांच्या हद्दीमध्ये वाहतूक पोलिसांनी २०२१ मध्ये १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत जम्पिंग सिग्नल प्रकारात तब्बल १ कोटी ३ लाख ५८ हजार ८०० रुपये एवढा दंड भरला आहे. वाहतूक पोलिसांनी वर्षभरात तब्बल जम्पिंग सिग्नल प्रकारात ४५ हजार ५२९ नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्याचवेळी १ जानेवारी ते ३१ मार्च २०२२ या तीन महिन्यांच्या कालावधीत १८ हजार २२३ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग दिसतच नाही
शहरातील बहुतांश सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टेच मारण्यात आलेले नाहीत. पट्टे मारण्याची जबाबदारी ही महापालिका प्रशासनाची असते. वाहतूक पोलिसांकडून महापालिकेला सतत याविषयी स्मरणपत्रे पाठविण्यात येतात. मात्र स्मार्ट सिटी प्रकल्प राबविणाऱ्या महापालिका प्रशासनाला त्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळालेला नाही. क्रांती चौकात झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे एका स्वयंसेवी संस्थेने मारले आहेत. त्याशिवाय महावीर चौक, मिल कॉर्नर, कार्तिकी हॉटेल, सेव्हन हिलसह बहुतांश महत्त्वाच्या सिंग्नलच्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग पट्टे दिसून येत नाहीत.
पायी चालणाऱ्यांची अडचण
झेब्रा क्रॉसिंग पट्टे नसल्यामुळे पायी चालणाऱ्यांची मोठी अडचण होते. बेशिस्त औरंगाबादकर झेब्रा क्रॉसिंग असलेल्या ठिकाणी नियमांचे पालन करीत नाहीत. सिग्नल लागल्यानंतरही गाड्या थांबवत नाहीत. थांबवलीच तर ती पट्ट्यावर उभी असते. याचा सर्वाधिक फटका हा पायी चालणाऱ्या नागरिकांना बसतो.
दंडात्मक कारवाई होईल
शहरातील प्रत्येक चौकात, सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंग असले पाहिजे, त्यासाठी शहर वाहतूक पोलीस महापालिका प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवतील. तसेच ज्याठिकाणी झेब्रा क्रॉसिंग पट्टे आहेत, त्याठिकाणी नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जो नियमभंग करेल, त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
- विशाल ढुमे, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग