बेरोजगार भाच्यास संपत्तीचा हव्यास, ८६ वर्षांच्या मामाचा दगडाने वार करून केला खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 18:48 IST2025-04-08T18:47:34+5:302025-04-08T18:48:50+5:30
भाच्याला खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

बेरोजगार भाच्यास संपत्तीचा हव्यास, ८६ वर्षांच्या मामाचा दगडाने वार करून केला खून
छत्रपती संभाजीनगर : संपत्तीच्या हव्यासातून भाच्यानेच मामाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रभाकर प्रल्हाद नाईक (८६, रा.कांचननगर) असे मृत व्यक्तीचे नाव असून, २४ मार्च रोजी भाच्याने डोक्यात दगडाने वार केले होते. उपचाराच्या दरम्यान त्यांचा रविवारी सायंकाळी मृत्यू झाला. मारेकरी सचिन सुधाकर जोशी (रा.चेलीपुरा) याला या प्रकरणी अटक केल्याचे साताऱ्याचे निरीक्षक संग्राम ताठे यांनी सांगितले.
शासकीय सेवेतून निवृत्त झालेले प्रभाकर त्यांची अविवाहित मुलगी सुलक्षणा यांच्यासोबत कांचननगरमध्ये राहत होते. सहा वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांचा भाचा सचिन त्यांच्या घरावर ताबा सांगत होता. २४ मार्च रोजी तो त्यांच्या घरी गेला. मला या घराचे भाडे द्या, अन्यथा राहू नका, असे म्हणत सुलक्षणा यांना मारहाण सुरू केली. प्रभाकर मुलीला वाचविण्यासाठी धावले. तेव्हा सचिनने घराबाहेर पडलेला दगड उचलून त्यांच्या डोक्यात वार केले. त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, २५ मार्च रोजीच त्यांना सुट्टी देण्यात आली. पाच दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना पुन्हा घाटीत दाखल करण्यात आले. ६ एप्रिल रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिनने डोक्यात दगडाने खाेलवर वार केले होते. मात्र, योग्य उपचाराअभावी संसर्ग वाढून त्यांचा मृत्यू झाला असावा. सचिनला त्याची पत्नी सोडून गेली असून तो बेरोजगार आहे. प्रभाकर यांचा मृत्यू होताच, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.