शिपाई भरतीसाठी बेरोजगारांचा लोंढा

By Admin | Published: December 29, 2014 01:06 AM2014-12-29T01:06:44+5:302014-12-29T01:07:17+5:30

औरंगाबाद : रोजगाराचा प्रश्न किती गंभीर बनला आहे, याचा प्रत्यय रविवारी भूमी अभिलेख खात्यातर्फे घेण्यात आलेल्या शिपाई पदाच्या परीक्षेत आला.

Unemployed for recruitment | शिपाई भरतीसाठी बेरोजगारांचा लोंढा

शिपाई भरतीसाठी बेरोजगारांचा लोंढा

googlenewsNext

औरंगाबाद : रोजगाराचा प्रश्न किती गंभीर बनला आहे, याचा प्रत्यय रविवारी भूमी अभिलेख खात्यातर्फे घेण्यात आलेल्या शिपाई पदाच्या परीक्षेत आला. शिपायाच्या ७८ जागांसाठी तब्बल साडेअकरा हजार बेरोजगारांचा लोंढा शहरात उसळला. विशेष म्हणजे चौथी पासची किमान पात्रता असली तरी पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवार या परीक्षेसाठी अधिक संख्येने आले होते.
भूमी अभिलेख खात्यातील मराठवाडा विभागामधील लघुलेखक, भूकरमापक, लिपिक टंकलेखक आणि शिपायांची रिक्त पदे भरण्यासाठी आज औरंगाबादेत लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळच्या सत्रात लघुलेखक आणि भूकरमापक पदांसाठी लेखी परीक्षा झाली. तर दुपारच्या सत्रात शिपाई पदासाठी परीक्षा घेण्यात आली. शहरातील सरस्वती भुवन महाविद्यालय, मिलिंद महाविद्यालय, छत्रपती महाविद्यालय, एमआयटी हायस्कूल, संत मीरा हायस्कूल आदी ३५ केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. या परीक्षेच्या निमित्ताने शासकीय नोकऱ्यांकडील तरुणांचा ओढा दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून आले.
दुपारच्या सत्रात शिपायाच्या ७८ जागांसाठी लेखी परीक्षा झाली. या पदांसाठी तब्बल १३,७७५ उमेदवारांनी अर्ज केले होते. यामध्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील तसेच यवतमाळ, वाशिम, बुलडाणा, धुळे आदी जिल्ह्यांतील उमेदवारांचाही समावेश होता. अर्ज केलेल्यांपैकी २,२२३ उमेदवार परीक्षेला गैरहजर राहिले.
उर्वरित ११ हजार ५७२ जणांनी ही परीक्षा दिली. शिपाईपदासाठी भूमी अभिलेख खात्याने चौथी उत्तीर्णची किमान पात्रता ठेवली होती.
तरीही प्रत्यक्षात परीक्षा देणाऱ्यांमध्ये पदवीधर आणि पदव्युत्तर असणाऱ्या उमेदवारांचा भरणा अधिक होता.

Web Title: Unemployed for recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.