काेविड योद्धाच कोरोनाने बेरोजगार, आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 08:23 AM2021-09-06T08:23:10+5:302021-09-06T08:24:02+5:30

आत्महत्येचा प्रयत्न; औरंगाबादेतील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची स्थिती

Unemployed, suicidal by Covid, a cavalry warrior | काेविड योद्धाच कोरोनाने बेरोजगार, आत्महत्येचा प्रयत्न

काेविड योद्धाच कोरोनाने बेरोजगार, आत्महत्येचा प्रयत्न

googlenewsNext
ठळक मुद्देरवी गांगवे असे या कोरोनायोद्धा कंत्राटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर आहे.

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : कोरोनाचा शिरकाव होताच ट्रॅव्हल्सचा व्यवसाय बंद झाला आणि बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. त्यानंतर घाटी रुग्णालयात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम मिळाले. कोविडयोद्धा म्हणून गौरवही झाला. शेवटी अचानक कामावरून काढून टाकले. अखेर घाटी रुग्णालयातून कमी केलेल्या या हतबल कंत्राटी कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. कोरोनाने एकदा नव्हे, दोनदा बेरोजगार केल्याची सल त्याच्या मनात खदखदत आहे.

रवी गांगवे असे या कोरोनायोद्धा कंत्राटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्याच्याशी संवाद साधला तेव्हा बेरोजगारीच्या चिंतेने टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याचे तो म्हणाला. घाटी रुग्णालयातील ८४ कंत्राटी कर्मचाऱ्यांना शनिवारी अचानक कमी करण्यात आले. कमी केलेल्या कर्मचाऱ्यांत रवीचाही समावेश आहे. नेहमीप्रमाणे शनिवारी तो कामावर गेला होता. त्याचवेळी आपल्याला कमी करण्यात आल्याचे त्याला समजले. काम गेल्याच्या चिंतेने शनिवारी रात्री त्याने फिनेल प्राशन केले; परंतु ही बाब वेळीच कुटुंबीयांच्या लक्षात आल्याने मित्र आणि कुटुंबीयांनी घाटीत दाखल केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अचानक कामावरून कमी करून टाकले जाईल, याची कल्पना नव्हती. माझ्यासह ८४ जण बेरोजगार झाले आहेत. त्यांच्या रोजगाराचा कोणी तरी विचार केला पाहिजे, असे रवी म्हणाला.

कर्मचाऱ्यांना परत घेण्यासाठी प्रयत्न
कंत्राटी कर्मचाऱ्यांना इतर फंडाच्या माध्यमातून परत घेता येईल का, यासंदर्भात प्रयत्न केला जात आहे. घाटीला कर्मचाऱ्यांची गरज आहेच. त्यामुळे सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत.     
- डाॅ. काशीनाथ चौधरी, वैद्यकीय अधीक्षक, घाटी

Web Title: Unemployed, suicidal by Covid, a cavalry warrior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.