छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघात महायुतीचा अनपेक्षित उमेदवार!
By बापू सोळुंके | Published: February 24, 2024 07:27 PM2024-02-24T19:27:36+5:302024-02-24T19:30:24+5:30
Neelam Gorhe : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी उपसभापती नीलम गोऱ्हे येथे आल्या होत्या.
छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघावर भाजपकडून तयारी सुरू आहे. असे असले तरी या मतदार संघातून अनपेक्षित उमेदवार असू शकतो, असा गौप्यस्फोट शिवसेना नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी येथे शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला. यापूर्वी त्या उमेदवारांसोबत आपण काम केलेले असू शकते, असेही त्यांनी नमूद केले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी उपसभापती नीलम गोऱ्हे येथे आल्या होत्या. सुभेदारी विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांसोबत त्यांनी आढावा बैठक घेतली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
गोऱ्हे म्हणाल्या की, जिल्ह्यातील सोयगाव आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. तर उर्वरित तालुक्यातही दुष्काळसदृश परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाने एक जी.आर.काढला आहे. या जी.आर.नुसार जूनपर्यंत बँकांनी कर्जवसुली थांबवावी, वीज कनेक्शन तोडू नये आणि विद्यापीठ, शाळांनी विद्यार्थ्यांकडून फीस वसुली करू नये, असे निर्देश आहेत. असे असताना विद्यापीठाने फीस वसुलीसाठी तगादा लावल्याचे समजल्याने शासनाच्या जी.आर.ची अशा प्रकारे अंमलबजावणी विद्यापीठ करीत आहे का, असा सवाल करीत याविषयी राज्यपालांना पत्र देणार असल्याचे त्या म्हणाल्या. मराठवाड्यातील उसतोड कामगार मार्चपासून आपल्या गावी परतण्यास सुरुवात होते. त्यांच्यावर बेरोजगाराची वेळ येऊ नये, यासाठी रोजगार हमी योजनेची कामे तयार ठेवण्याची सूचना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना केली असता त्यांनी ६५ हजार रोहयो कामे तयार असल्याचे सांगितले.
शरद पवार यांच्या पक्षाला बरे चिन्ह मिळाले
शरद पवार यांच्या पक्षाला निवडणूक आयोगाने दिलेल्या तुतारी निवडणूक चिन्हाबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे. याबाबत गोऱ्हे म्हणाल्या की, शरद पवार यांच्या पक्षाला बरे चिन्ह मिळाले आहे. कारण मी रिपाइंमध्ये काम केलेले आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी वेगवेगळे चिन्ह मिळत होते. यापेक्षा तुतारी बरी.
निर्दोष कायदा केला, नकारात्मकतेने पाहू नये
मराठा समाजाचे यापूर्वीचे दोन कायदे टिकले नाहीत. आता नुकताच एकमताने संमत झालेला नवा कायदा निर्देाष केला आहे. याकडे मराठा समाजाने नकारात्मकतेने पाहू नये, असे आपल्याला वाटत असल्याचे उपसभापती म्हणाल्या.