‘अनाकलनीय’ राजकारण : सर्वच पक्षांचे कार्यकर्ते संभ्रमात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:05 AM2021-09-22T04:05:52+5:302021-09-22T04:05:52+5:30
औरंगाबाद : राज्यातील सध्याचे राजकारण गुंतागुंतीचे आणि अनाकलनीय असल्याची भावना वाढत असून, आगामी निवडणुकांपर्यंत युती व आघाड्यांची स्थिती ...
औरंगाबाद : राज्यातील सध्याचे राजकारण गुंतागुंतीचे आणि अनाकलनीय असल्याची भावना वाढत असून, आगामी निवडणुकांपर्यंत युती व आघाड्यांची स्थिती नेमकी अशी असेल, याबाबत सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १७ सप्टेंबर रोजी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यानंतर राज्य पातळीवर सुरू झालेल्या राजकीय घुसळणीनंतर ही संभ्रमावस्था आणखी वाढली. शिवसेना - भाजप एकत्र येतात की काय, अशी चर्चा सुरू झाली. चिमटे काढणे, उपहास करणे आणि टोले लगावणे हा मुख्यमंत्र्यांचा स्वभाव आहे व त्याला अनुसरूनच ते बोलले असावेत, असे काही जणांना वाटते. औरंगाबादेत वर्षानुवर्षे महापालिकेत शिवसेना व भाजपची सत्ता राहिली. शिवाय, मनपाची निवडणूक होऊ घातलेली आहे. सर्वच पक्षांचे कार्यकर्ते निवडणुकीसाठी सज्ज असतात आणि ती डोळ्यासमोर ठेवून राजकीय गणिते मांडत असतात. शहरात एमआयएमचा एक मोठा दबाव गट निर्माण झाल्याने राजकारणाचा रंग बदलतो आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी युतीच्या संकेताची गुगली टाकून पाहिली असावी, असे काही कार्यकर्त्यांना वाटत आहे.
१७ सप्टेंबरनंतर मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया, किरीट सोमय्या यांनी उडवून दिलेला आरोपांचा धुरळा, त्यावरून उमटणाऱ्या प्रतिक्रिया, महाविकास आघाडीतील जाणवणारा विसंवाद यावरून संभ्रम वाढतो आहे. मुख्यमंत्र्यांच्या मनातही काहीतरी आहे, असे वाटू लागले आहे. सरकार पाडायचं आहे; पण त्याचं पाप आमच्या पदरात नको, अशी सावध भूमिका भाजपची दिसून येते. सध्याच्या राजकारणात कोण कुणावर दबाव वाढवतोय, मुख्यमंत्री कॉंग्रेस- राष्ट्रवादीवर दबाव वाढवू इच्छित आहेत, की भाजप-राष्ट्रवादीवर, आगामी सरकार शिवसेना - भाजपचे की राष्ट्रवादी कॉंग्रेस- भाजपचे, अशा खमंग चर्चांचे पेव फुटले आहेत. ईडी, सीबीआयचा भुंगा कधी कोणत्या नेत्याच्या मागे लागेल, याचा नेम राहिला नाही. या पार्श्वभूमीवर कोणता झेंडा घेऊ हाती, असा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.