दुर्दैवी! चौकीतच हृदयविकाराने पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 08:17 PM2022-12-14T20:17:04+5:302022-12-14T20:17:42+5:30
पोलिस चौकीच्या प्रवेशद्वारातच बेशुद्धावस्थेत पडले होते पोलीस कर्मचारी
सोयगाव (औरंगाबाद) : तालुक्यातील बनोटी येथील चौकीत कर्तव्यावर असताना हृदयविकाराचा झटका आल्याने एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर रामजी सरताळे (वय ३५) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.
ज्ञानेश्वर सरताळे हे सोमवारी रात्री बनोटी येथील पोलिस चौकीत कर्तव्यावर होते. रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यामध्ये ते पोलिस चौकीच्या प्रवेशद्वारातच बेशुद्धावस्थेत पडल्याचे काही पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच असलेल्या पाचोरा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. येथे उपचारादरम्यान रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी पहाटे मृत ज्ञानेश्वर सरताळे यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन पाचोरा येथे करण्यात आले.
याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर त्यांच्या मुळ गावी वाकी (ता. जामनेर) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जळगाव पोलिसांच्या वतीने त्यांना हवेत तीन राऊंड फायर करून मानवंदना देण्यात आली. यावेळी सोयगाव व जळगाव येथील पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मयत ज्ञानेश्वर सरताळे यांच्या पश्चात आई, वडील, चार भाऊ, एक बहीण, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.