प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे बळी

By Admin | Published: July 9, 2014 12:16 AM2014-07-09T00:16:41+5:302014-07-09T00:30:12+5:30

वाशी : तालुक्यातील तेरखेडा येथील अनधिकृत फटाके निर्मिती कारखान्यात झालेल्या तीन स्फोटात आजवर तब्बल १४ जणांचे बळी गेले आहेत़

The unfortunate victim of the administration | प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे बळी

प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे बळी

googlenewsNext

वाशी : तालुक्यातील तेरखेडा येथील अनधिकृत फटाके निर्मिती कारखान्यात झालेल्या तीन स्फोटात आजवर तब्बल १४ जणांचे बळी गेले आहेत़ घटनेनंतर काही दिवस कारवाईचा बडगा उगारणाऱ्या महसूल, पोलिस प्रशासनाने नंतर मात्र, त्या कारखान्यांकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याने मजुरांचा बळी जाण्याचे सत्र सुरूच असल्याच्या संतप्त भावना तेरखेडा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत़ अनेक अनधिकृत कारखाने सुरू असतानाही प्रशासन दूर्लक्ष करीत असल्याने या घटना घडत आहेत. प्रशासन आता तरी जागे होऊन ठोस कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुकुंद चेडे ल्ल वाशी
फटाके निर्मिती करण्यासाठी तेरखेडा येथे १८ कारखान्यांना मंजुरी आहे़ प्रारंभीच्या काळात येथील फटाके पुणे, मुंबईसह हैदराबादेतील बाजारपेठेतही विक्रीस जात होते़ त्यामुळे मराठवाड्याची शिवकाशी म्हणून तेरखेडा गावाची ओळख निर्माण झाली होती़ या कारखान्यामुळे अनेक मजुरांच्या हाताला कामही मिळाले़ तेरखेड्यासह खामकरवाडी, सटवाईवाडी, गोजवाडा आदी परिसरातील जवळपास ३०० ते ३५० मजुरांच्या हाताला काम मिळाले़ मात्र, कारखान्यातून मिळणारे उत्पन्न पाहता अनेकांनी अनधिकृतरीत्या कारखाने सुरू केले आहेत़ तर एक परवाना असतानाही अनेकांनी इतरत्र दोन-तीन कारखाने सुरू करून आपला धंदा सुरू केला आहे़ अनेक नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे येथील कारखान्यातील कामकाज सुरू असतानाही महसूलसह पोलिस प्रशासनाने चौकशी करून कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले़ परिणामी काही वर्षापूर्वी जेक़ेफ़ायर वर्क्स या कारखान्यात भीषण स्फोट झाला़ त्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता़ तर अनेकजण गंभीर जखमी झाले होते़ या घटनेने जागे झालेल्या प्रशासनाने कागदी घोडे नाचवून कारवाईचा स्टंट केला़ त्यानंतर जवळपास दीड वर्षापूर्वी औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील भरवस्तीत असलेल्या गडूशा शेख यांच्या घरातील फटाक्यांचा स्फोट होऊन त्यांची सून मयत झाली होती़ तर मंगळवारी दोन कारखान्यावर वीज पडून झालेला स्फोट हा आजवरच्या इतर घटनांहून भीषण प्रकार आहे़ या घटनेत एका बालिकेसह पाच महिला, दोन पुरूष जागीच ठार झाले़ त्यांचे शरीर छिन्न-विछिन्न झाले होते़ तर गंभीर जखमी वाचावेत, यासाठी प्रत्येकजण देवाचा धावा करीत होता़ या घटनेने अख्ख्या तेरखेडा गावावर शोककळा पसरली आहे़ अशी काही घटना घडल्यानंतर अनधिकृत कारखाने चालविणारे घरातील दारूचे साहित्य रानामाळावर फेकून देतात़ याची माहिती पोलिसांना मिळते मात्र, पोलिस का कारवाई करीत नाहीत हे कोडे अद्याप ग्रामस्थांना सुटलेले नाही़
मंगळवारच्या घटनेनंतर दाखल झालेल्या पोलिस व महसूल प्रशासनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मदत कार्यावर भर दिला़ यानंतर घटनेची चौकशी होईल, काही निष्पन्न झालेच तर गुन्हाही दाखल होईल़ मात्र, त्यानंतरची कठोर पावले उचलण्याची कारवाई ही नेहमीप्रमाणेच हवेत विरेल. या प्रकरणानंतर तरी प्रशासनाने ठोस कारवाई करण्याची मागणी होत आहे.
बालकामगारांचाही समावेश
तेरखेडा गावासह परिसरातील अनेक पुरूष, महिला मजूर येथील कारखान्यात कामाला येतात़ मजुरी चांगली मिळत असल्याने कुटुंबाच्या उदनिर्वाहासाठी अनेकजण जीव धोक्यात घालून येथे काम करतात़ मात्र, येथील अनेक कारखान्यात बालकामगार राबताना दिसून येतात़ बालकामगारांच्या बाबतीतही प्रशासनाने आजवर कोणतीच ठोस कारवाई केलेली नाही़ त्याचाच परिणाम म्हणून या दुर्घटनेत एका बालिकेलाही आपला जीव गमवावा लागला आहे़
निकृष्ट साहित्य
गणेशोत्सव, दिवाळी असो अथवा इतर कोणताही सण; येथे मोठ्या प्रमाणात फटाक्यांची निर्मिती केली जाते़ फटाक्यांची निर्मिती करताना येथील कारखानदारांना ४ ते १२ किलोचे साहित्य बाळगण्याची परवानगी आहे़ हा नियम डावलून येथे मोठ्या प्रमाणात साहित्य बाळगले जाते़ त्यातही मुंबई येथील काही व्यापाऱ्यांकडून निकृष्ट दर्जाचे साहित्य घेऊन कारखान्यात वापरले जाते़
तीन आठवड्यांपूर्वीही झाला होता स्फोट
तेरखेडा येथील एका फटाका कारखान्यात तीन आठवड्यापूर्वीच मोठा स्फोट झाला होता़ मात्र, त्यावेळी सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नव्हती़ जीवित हानी न झाल्याने या घटनेची वाच्यता झाली नाही़ कारखानदाराचे आर्थिक नुकसान झाले़ या घटनेची माहितीही पोलिस प्रशासनास लागली होती़ मात्र, साधी चौकशीही झाली नसल्याचे अनेक ग्रामस्थांनी सांगितले.
निष्काळजीपणा जबाबदार
फटाक्यांच्या कारखान्यात काम करणारे लोक आर्थिक दुर्बल घटकातील आहेत़ केवळ कारखानदार व प्रशासन यांच्या निष्काळजीपणामुळे असे अपघात घडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. स्फोटक कारखान्यात वीजरोधक यंत्रणा नसल्याचे तसेच कामगारांना कसलीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने हा अपघात घडतो असे ग्रा.पं. सदस्य रणजित घुले म्हणाले.

Web Title: The unfortunate victim of the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.