दुर्दैवी! बकरीच्या कोकरास वाचविण्यास विहिरीत उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 04:33 PM2022-03-05T16:33:39+5:302022-03-05T16:34:14+5:30
पोहता येत नसतानाही बकरीच्या पिल्ल्यास वाचविण्यसाठी तरुणाने केले धाडस
खुलताबाद: विहिरीत पडलेले बकरीचे कोकरू काढण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी खुलताबाद तालुक्यातील पळसवाडीतांडा येथे घडली. विनोद वसंत राठोड असे मृताचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, पळसवाडीतांडा येथे पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत बकरीचे कोकरू पडल्याने ते काढण्यासाठी विनोद राठोड विहिरीत उतरला. परंतु, त्याला पोहणे येत नसल्याने तो पाण्यात बुडाला. विहिरीत पाणी जास्त असल्याने विनोदचा शोध लागत नव्हता. अखेर अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. काहीवेळाने जवानांनी विहिरीतून विनोदचा मृतदेह बाहेर काढला.
पोलिस निरीक्षक भुजंग हातमोडे ,उपनिरीक्षक संजय बहुरे जे. बी. मुरमे, शेख कलीम, गायकवाड यांनी घटनास्थळीचा पंचनामा केला. पंचायत समिती सदस्य युवराज ठेंगडे, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुधाकर दहिवाळ, किसन राठोड ,धर्मा पवार, हिरामण राठोड व ग्रामस्थांनी मृतदेह काढण्यासाठी मदत केली. विनोद बीए प्रथम वर्षात शिकत होता. त्याच्या पश्चात आई वडील , एक भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.