दुर्दैवी ! रिक्षा उलटल्याने तीनवर्षीय बालकाचा अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 01:54 PM2021-02-10T13:54:24+5:302021-02-10T13:55:36+5:30
मुलाला घेऊन कुटुंब रिक्षाने सिडको बसस्थानक येथून शाहनूरमियाँ दर्गा येथील बसथांब्याकडे जात होते.
औरंगाबाद : चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव रिक्षा उलटून झालेल्या अपघातात तीनवर्षीय बालकाचा अंत झाला, तर मृताची आजी, आई, वडील आणि तीन महिन्यांचा भाऊ किरकोळ जखमी झाले. ही घटना विजयनगरात मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास झाली.
विराज श्रीकृष्ण बांगर (३, रा. बोरगाव, जि. अकोला), असे मृताचे नाव आहे. विराजचा तीन महिन्यांचा भाऊ साहिल याच्या हृदयात छिद्र असल्याने त्याची आई शिल्पा, वडील श्रीकृष्ण आणि आजी नर्मदा रणसिंगे, हे साहिलला शिर्डी येथील दवाखान्यात घेऊन गेले होते. तेथून ते गावी परत जाण्यासाठी सायंकाळी औरंगाबादला आले. ट्रॅव्हल्स बसची तिकीट बुकिंग करण्यासाठी ते रिक्षाने सिडको बसस्थानक येथून शाहनूरमियाँ दर्गा येथील बसथांब्याकडे जात होते.
रात्री ८ वाजेच्या सुमारास विजयनगर चौकाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा उलटली. या अपघातात रिक्षात बसलेले श्रीकृष्ण गजानन बांगर, शिल्पा श्रीकृष्ण बांगर, नर्मदा मनोहर रणसिंगे, विराज हे खाली पडले. यात विराजच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो घटनास्थळीच ठार झाला. यानंतर त्याला पुंडलिकनगर ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खंडागळे आणि निकम यांनी घाटीत हलविले. यात नर्मदा यांचे हाताचे हाड मोडले. या घटनेनंतर रिक्षाचालक रिक्षा सोडून पळून गेला. याविषयी पुंडलिकनगर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.