गणवेश, पुस्तके पहिल्याच दिवशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2016 11:23 PM2016-03-20T23:23:30+5:302016-03-20T23:30:19+5:30
हिंगोली : विद्यार्थ्यांना शाळा सुरू होताच पहिल्या दिवशी शालेय गणवेश व पाठ्यपुस्तके मिळावित यासाठी शिक्षण विभागाकडून पूर्वतयारी करण्यात आली आहे.
हिंगोली : विद्यार्थ्यांना शाळा सुरू होताच पहिल्या दिवशी शालेय गणवेश व पाठ्यपुस्तके मिळावित यासाठी शिक्षण विभागाकडून पूर्वतयारी करण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्ष २०१६-१७ च्या जून महिन्यामध्ये लागणाऱ्या शालेय साहित्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तके व स्वाध्याय पुस्तिकेसाठी आॅनलाईन नोंदणी करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी गंगाधर जाधव यांनी दिल्या आहेत. गतवर्षी शालेय गणवेशासाठी ३ कोटी ३३ लक्ष रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली होती. अनुदानित व जिल्हा परिषदेच्या शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत शालेय गणवेश, पाठ्यपुस्तके व स्वाध्यायस्तिका वाटप केली जातात. परंतु अनेकदा तांत्रिक अडचणी किंवा गणवेशाचे मोजमाप न झाल्याने विद्यार्थ्यांना वेळेत शालेय साहित्य वाटप होत नाही.
परिणामी, ऐनवेळी विद्यार्थ्यांना साहित्य वळेवर न मिळाल्याने गैरसोय होते. याबाबत शिक्षण विभागाकडून काळजी घेत चालू शैक्षणिक वर्षातील जून महिन्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना साहित्य वाटपाचे नियोजन केले आहे. त्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यार्थी संख्येनुसार आॅनलाईन नोंदणी करण्यास पत्राद्वारे कळविले आहे.
(प्रतिनिधी)
सर्व अनुदानित व जि. प. च्या पहिली ते आठवीच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके, स्वाध्यायपुस्तिका शाळेच्या पहिल्या दिवशी वाटप होणे आवश्यक आहे. याची माध्यम, इयत्ता, विषयनिहाय अचूक मागणी आॅनलाईन नोंदविणे आवश्यक आहे. परंतु २०१५-१६ च्या शैक्षणिक वर्षातील शिल्लक
पुस्तकांची संख्या वजा करून आवश्यक तेवढीच मागणी करावी लागणार आहे. आॅनलाईन मागणी नोंदविताना चूक आढळल्यास त्याची जबाबदारी गट शिक्षणाधिकाऱ्यांवर राहणार आहे. सदर कामे होताच अहवाल सर्व शिक्षा अभियानकडे तत्काळ द्यावा लागणार आहे.
ठरवून दिलेल्या वेळेत विद्यार्थीनिहाय गणवेशाचे माप घेतले जावे, मुलींच्या गणवेशाबाबतची मापे स्त्री शिलाई कामगारांकडून करून ेघेतली जावीत. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या स्त्री सदस्या, गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती उपस्थित असणे आवश्यक आहे. शाळेला आवश्यक असलेल्या गणवेशाची मोजमापे घेतली जावीत. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या गणवेशाची मापे शक्यतोवर एकाच दिवशी घेण्यात यावीत. सर्व मापे ही गणवेश मोजमापाबद्दल ठरवून दिलेल्या सूचनेप्रमाणे घेणे बंधनकारक आहे.