केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज शहरात; उद्याच्या सभेच्या पार्श्वभूमी 'या' मार्गावर वाहतुकीत बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 12:03 PM2024-03-04T12:03:51+5:302024-03-04T12:04:28+5:30
अमित शहा यांच्या सभेसाठी वाहतुकीत बदल, ५ मार्च रोजी दुपारी २ ते रात्री १२ वाजेपर्यंत सभास्थळाकडील मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ४ मार्च सोमवार रोजी रात्री १०.१० मिनिटांनी शहरात येत आहेत. दरम्यान, शाह यांच्या सांस्कृतिक क्रीडा मंडळावरील सभेसाठी मंगळवारी मोठ्या संख्येने कार्यकर्ते येणार आहेत. त्यामुळे वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत.
सोमवारी रात्री विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते जालना रोडवरील रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये मुक्कामी थांबतील. मंगळवार ५ रोजी सकाळी सव्वा दहा वाजता विमानतळ येथून हेलिकॉप्टरने अकोल्याकडे रवाना होतील. अकोल्यात चार लोकसभा सर्किटची बैठक त्यांच्या उपस्थितीत होईल. त्यानंतर ते जळगावकडे जातील. तेथील नियोजित कार्यक्रम आटोपून सायं. ५ वा. ४० मिनिटांनी ते छत्रपती संभाजीनगर विमानतळाकडे हेलिकॉप्टरने येतील.
सायं. ६ वा. १० मिनिटांनी ते वाहनाने क्रांतीचौक कडे प्रयाण करतील. तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतील. तेथून मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानाकडे रवाना होतील. सायं. ६ वा. ३५ मिनिटांनी जाहीर सभेस उपस्थित राहून संबोधन करतील. सायंकाळी साडेसात वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावरुन मोटारीने विमानतळाकडे जातील. तेथून ७.३४ वा. विमानाने मुंबईकडे रवाना होतील.
अमित शहा यांच्या सभेसाठी वाहतुकीत बदल
५ मार्च रोजी दुपारी २ ते रात्री १२ वाजेपर्यंत खालील मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत. ही माहिती वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त अशोक थोरात यांनी दिली. त्यात जुनी मल्टीपर्पज शाळा ते नारळीबाग चौक, आयटीआय ते खडकेश्वर टी पॉइंट, जुबिली पार्क ते मराठवाडा सांस्कृतिक मंडळाकडे जाणारा रस्ता, गीता झेरॉक्स ते मराठवाडा सांस्कृतिक मंडळाकडे जाणारा रस्ता, मिल कॉर्नर ते खडकेश्वरमार्गे महात्मा फुले चौकाकडे जाणारा रस्ता बंद असणार आहे. त्यास मिल कॉर्नर ते भडकल गेट आणि मिल कॉर्नर ते वरद गणेश मंदिरमार्गे सावरकर चौक असा पर्यायी रस्ता असणार आहे.