सुपर स्पेशालिटी विभागाच्या कामाबाबत केंद्रीय मंत्र्यांनी दिलेली डेडलाईन हुकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 08:05 PM2018-10-01T20:05:24+5:302018-10-01T20:06:21+5:30
एक दिवसही वर होता कामा नये, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी तंबी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी कंत्राटदाराला दिली होती.
औरंगाबाद : घाटीतील सुपर स्पेशालिटी विभागाच्या कामांमध्ये दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. सप्टेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत काम पूर्ण झाले पाहिजे. एक दिवसही वर होता कामा नये, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी तंबी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी कंत्राटदाराला दिली होती. परंतु चौबे यांनी दिलेली डेडलाईन हुकली असून, या विभागाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही.
घाटी रुग्णालयात अश्विनीकुमार चौबे यांनी २२ जुलै रोजी आढावा बैठक घेऊन सुपर स्पेशालिटी विभागाच्या कामाची पाहणी केली होती. केंद्र आणि राज्य सरकारच्या साह्याने उभारण्यात येणाऱ्या २२० खाटांच्या स्वतंत्र सुपर स्पेशालिटी विभागाच्या इमारतीचे कामकाज डिसेंबर-२०१७ अखेरीस पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु केवळ ७५ टक्के काम पूर्ण झाल्याने चौबे यांनी कंत्राटदाराला कामाला विलंब होण्याची कारणे विचारली. तेव्हा काम सुरू करण्यासाठी विद्युत वाहिन्यांसह अन्य अडचणींमुळे कामाला उशीर झाल्याचे सांगण्यात आले. चौबे यांनी कामगारांची संख्या विचारल्यावर ३१५ इतकी सांगण्यात आली. मी पाहण्यासाठी येणार असल्याने इतकी संख्या केली का, असा प्रश्नही चौबे यांनी उपस्थित केला होता.
काहीही असो दोन महिन्यांत या विभागाचे काम पूर्ण करा, एक दिवसही वर होता कामा नये, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी ताकीद चौबे यांनी दिली होती. केंद्रीय मंत्र्यांच्या आदेशानंतरही अद्याप काम सुरूच आहे. त्यामुळे डिसेंबर-२०१७ ही केंद्रीय मंत्र्यांनी दिलेली डेडलाईनदेखील हुकली आहे. याठिकाणी आवश्यक ती यंत्रे दाखल होत आहेत.एमआरआय, कॅथलॅब, निर्जंतुकीकरण विभाग, आॅपरेशन थिएटरचे काम प्रगतिपथावर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. परंतु संपूर्ण काम पूर्ण होण्यास महिनाभर लागण्याची परिस्थिती आहे. या कामाला गती देण्याचा प्रयत्न घाटी प्रशासनाकडून सुरू आहे.
आॅक्टोबरमध्ये काम पूर्ण
सुपर स्पेशालिटी विभागाचे काम आॅक्टोबरमध्ये पूर्ण होईल, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.