केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांचे आज होणार जोरदार स्वागत
By Admin | Published: May 29, 2014 12:01 AM2014-05-29T00:01:43+5:302014-05-29T00:41:02+5:30
जालना : केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील हे गुरूवारी पहिल्यांदाच जालन्यात दाखल होणार आहेत.
जालना : केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील हे गुरूवारी पहिल्यांदाच जालन्यात दाखल होणार असून, त्यांचे महायुतीतर्फे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे, अशी माहिती माजीमंत्री अर्जुन खोतकर यांनी पत्रकार परिषदेतून दिली. केंद्रीय मंत्रिमंडळात दानवे यांच्या रूपाने या जिल्ह्यास पहिल्यांदाच प्रतिनिधीत्व मिळाल्याने जालनेकरांना मोठा आनंद झाल्याचे खोतकर यांनी म्हटले. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने हा जिल्हा भारावलेला आहे. त्याचे प्रत्यंतर लोकसभा निवडणुकीतून प्रकर्षाने दिसून आल्याचे नमूद करीत, खोतकर यांनी दानवे यांच्या मंत्रीपदामुळे जिल्हावासियांच्याही अपेक्षा उंचावल्या आहेत. त्या इच्छा-आकांक्षांची निश्चित पूर्तता होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या छोट्याशा मंत्रिमंडळात दानवेंचा समावेश करीत, या जिल्हावासियांना निश्चितपणे न्याय दिला असून, भविष्यातसुद्धा ते या जिल्हावासियांचे सर्वांगीण विकासाचे प्रश्न मार्गी लावतील, असे ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळात या जिल्ह्यास पहिल्यांदा प्रतिनिधीत्व मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर दानवे यांचे महायुतीतर्फे गुरूवारी जोरदार स्वागत केले जाईल, असे खोतकर यांनी म्हटले. मोतीबागेपासून दानवे यांची दुपारी १ वाजता मोठी मिरवणूक काढली जाणार आहे. कचेरी रोड, मंमादेवी, काद्राबाद, सराफा, आर.पी. रोड, सिंधी बाजारमार्गे मिरवणुकीचा मामा चौकात समारोप होणार आहे. त्या ठिकाणी दानवे यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिर्लेकर, आ. संतोष सांबरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष बबनराव लोणीकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, ए.जे. बोराडे, माजी आ. शिवाजीराव चोथे, उपनेते लक्ष्मणराव वडले, रिपाइंचे विभागीय अध्यक्ष अॅड. ब्रह्मानंद चव्हाण, जि.प. अध्यक्षा आशा भुतेकर, किशोर अग्रवाल यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी,विविध संघटना, संस्थांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत, असे खोतकर यांनी म्हटले. यावेळी अॅड. संजीव देशपांडे, शहराध्यक्ष विष्णू पाचफुले, बाला परदेशी आदी उपस्थित होते. पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भव्य-दिव्य असा शपथविधी सोहळा आपल्या जीवनातील एक आनंदाचा क्षण ठरल्याचे खोतकर यांनी नमूद केले. दानवे कुटुंबियांसह आपण व किशोर अग्रवाल हे या सोहळ्यास उपस्थित होतो, असे ते म्हणाले. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या स्वागताकरिता महायुतीच्या पुढार्यांसह पदाधिकार्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा भुतेकर यांच्या निवासस्थानी प्रमुख पदाधिकार्यांची बैठक आयोजित करण्यात आली. त्यातून रूपरेषा ठरविण्यात आली. यास जि.प. अध्यक्षा भुतेकर, अॅड. ब्रह्मानंद चव्हाण, अॅड. भास्करराव मगरे, अनिरूद्ध खोतकर, पंडितराव भुतेकर, किशोर अग्रवाल, भानुदास घुगे, भाऊसाहेब घुगे, मुरलीधर शेजूळ, रावसाहेब राऊत, वीरेंद्र धोका, संतोष मोहिते, सुधाकर वाढेकर, विष्णू पाचफुले, बाला परदेशी, माधवराव टकले, सविता किवंडे, गंगूबाई वानखेडे, बजरंग राजपूत, जगन्नाथ चव्हाण, राम सतकर, महेश दुसाने, संताजी वाघमारे, बाबूराव पवार, विजय पवार, अशोक पवार, विजय जाधव, श्याम कदम, सचिन भांदरगे, यादवराव राऊत, बाबूराव खरात, विष्णू चव्हाण, सखाराम भापकर, सिद्धीविनायक मुळे आदी उपस्थित होते.