‘स्वरचैतन्य’मधून सप्तसुरांचा अनोखा साक्षात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:38 AM2017-10-13T00:38:58+5:302017-10-13T00:38:58+5:30
पारंपरिक ठुमरी व गझल आणि वाद्यसंगीताच्या फ्युजनची मेजवानी देण्यासाठी ‘लोकमत’तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘दिवाळी पहाट’चे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दिवाळी म्हणजे आनंद, दिवाळी म्हणजे नवचैतन्य! अशा या नवचैतन्यपूर्ण आनंदोत्सवात औरंगाबादकरांना नव्या युगातील कविता, पारंपरिक ठुमरी व गझल आणि वाद्यसंगीताच्या फ्युजनची मेजवानी देण्यासाठी ‘लोकमत’तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘दिवाळी पहाट’चे आयोजन करण्यात आले आहे. दिशा ग्रूप प्रस्तुत लोकमत ‘स्वरचैतन्य’ दिवाळी पहाटमध्ये यंदा प्रसिद्ध नाट्यकलावंत व कवी मकरंद देशपांडे, डॉ. पं. अजय पोहनकर, अभिजित पोहनकर या अद्वितीय त्रिकुटाच्या काव्य मैफिलीचा आनंद घेता येणार आहे.
लोकमत भवनच्या हिरवळीवर २० आॅक्टोबर रोजी पाडव्याच्या मंगलमयी वातावरणात सकाळी ६ वाजता देशपांडे यांचे काव्यवाचन, पं. पोहनकर यांचे मन तृप्त करणा-या स्वरात पारंपरिक ठुमरी आणि गझल गायन आणि अभिजित पोहनकर यांचे की बोर्ड, गिटार, बासरी आणि तबला वादनाचे फ्युजन असा त्रिवेणी संगम ऐकण्याचा योग यानिमित्त जुळून आला आहे.
पारंपरिक गायकी आणि नवतरुणांना साद घालणारा फ्युजनचा प्रकार व त्यात अर्थपूर्ण काव्यसरींची बरसात म्हणजे कमालच! आबालवृद्धांना आकर्षित करणारी ही मैफल औरंगाबादकरांसाठी अविस्मरणीय ठरणार यात काही शंका नसावी. लोकमत सखी मंचतर्फे आयोजित ‘स्वरचैतन्य’ या सूरमयी कार्यक्रमाचे ‘दिशा गु्रप’ प्रमुख प्रायोजक आहेत, तर ‘भाग्यविजय’ आणि ‘लिटिल एंजल्स इंग्लिश स्कूल’ सहप्रायोजक आहेत. तसेच डेकोरेशन पार्टनर ‘महावीर डेकोरेटर’ तर हॉस्पिटॅलिटी पार्टनर ‘अगत्य केटरर्स’ आहेत. चला तर मग पहाटेच्या गुलाबी थंडीत चमचमीत फराळाच्या आस्वादासोबत काव्य, स्वर आणि संगीताचीही मेजवानी अनुभवयाला तयार राहा.