नागरिक, विद्यार्थी अन् गीतांनी दिली धावपटूंना अनोखी ऊर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 07:59 PM2018-12-17T19:59:15+5:302018-12-17T20:06:31+5:30

महामॅरेथॉनच्या नियोजित मार्गावर भल्या पहाटे लहान मुले, महिला, युवा, ज्येष्ठांनी मोठी गर्दी केली होती.

Unique power to the runners by the citizens, students and songs | नागरिक, विद्यार्थी अन् गीतांनी दिली धावपटूंना अनोखी ऊर्जा

नागरिक, विद्यार्थी अन् गीतांनी दिली धावपटूंना अनोखी ऊर्जा

googlenewsNext
ठळक मुद्देमहामॅरेथॉनच्या मार्गावर विद्यार्थ्यांच्या लेझीम, ढोल पथकांनी वाढविले मनोबल, देशभक्तीपर आणि भक्तिगीतांचे सादरीकरण

औरंगाबाद :  विभागीय क्रीडा संकुल मैदानातून स्पर्धेला सुरुवात होताच जिंकण्यासाठी, स्वत:साठी, स्वत:च्या आरोग्यासाठी धावणारे स्पर्धक ...सादर होणारी देशभक्तीपर गीते, सोबत शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांकडून दिले जाणारे प्रोत्साहन...अशा जल्लोषपूर्ण वातावरणात रविवारी सकाळी धावपटूंना आगळीवेगळी ऊर्जा मिळाली.

महामॅरेथॉनच्या नियोजित मार्गावर भल्या पहाटे लहान मुले, महिला, युवा, ज्येष्ठांनी मोठी गर्दी केली होती. शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांच्या लेझीम, ढोलपथकाने सूतगिरणी चौक, गजानन महाराज मंदिर चौक, सेव्हन हिल चौक, सिडको बसस्थानक चौक या मार्गावर धावपटूंचा जोम वाढविला.

धावपटूंना चिअर-अप करण्यासाठी जवाहरनगर पोलीस ठाण्यासमोरील मार्गावर रॉक बँडच्या कलावंतांकडून विविध गीते म्हणण्यात येत होती. गजानन महाराज मंदिर चौकात ह.भ.प. माधव महाराज पित्तरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गायनसम्राट ह.भ.प. सुंदर महाराज काळे यांनी भक्तिगीते सादर केली. यावेळी मृदंगाचार्य कांगणे महाराज, बबन डिडोरे पाटील आदींनी साथसंगत केली.

सेव्हन हिल चौकात पुष्पवृष्टी
 सेव्हन हिल उड्डाणपूल येथे जकात नाका येथील अल हुदा स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्पधर्कांवर पुष्पवृष्टी केली. तसेच शाळेच्या ढोल पथकाने स्पर्धकांचा उत्साह वाढविला. सेव्हन हिल उड्डाणपुलापुढे डॉ. देसरडा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषा साकारून लेझीमचे सादरीकरण केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध संदेश लिहिलेल्या फलकांद्वारे स्पर्धकांचे मनोबल वाढविले.

शिवाजीनगर येथील गीता विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांच्या झांज पथकाने सूतगिरणी चौकात स्पर्धकांना प्रोत्साहन दिले. जवाहरनगर पोलीस ठाण्यालगतच्या शिवनेरी कॉलनीतील गजानन बहुद्देशीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आणि गजानन महाराज मंदिर ते कडा कार्यालयाच्या मार्गावर जयभवानी विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी लेझीम, जगदंबा प्रतिष्ठान शिक्षण संस्था संचलित प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या ढोल पथकाने बहारदार सादरीकरणातून स्पधर्कांचे मनोबल वाढविले. अग्रसेन चौकात संत मीरा हायस्कूलच्या ‘एनसीसी’च्या विद्यार्थ्यांनी, सिडको बसस्थानक चौकात एमआयटी हायस्कूल, सेंट लॉरेन्स इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या ढोल पथकानेही आपल्या सादरीकरणातून वातावरण जल्लोषपूर्ण केले. यावेळी शिक्षकांची उपस्थिती होती. ठिकठिकाणी स्टॉल्सवरून धावपटूंना पाणी, हेल्थ ड्रिंक्स यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. 

ताशांचा आवाज तर्रारा झाला अन्...
पहाटेची गुलाबी थंडी... ढोल-ताशांचा गजर... अन् धावपटूंचा अपूर्व उत्साह... अशा अभूतपूर्व आणि जोशपूर्ण वातावरणाने ढवळून निघालेली रविवारची पहाट औरंगाबादकरांच्या कायम स्मरणात राहील. बरोबर पहाटे ६ वाजून ६ मिनिटाला मॅरेथॉनमध्ये सहभागी पहिला धावपटू ‘लोकमत भवन’समोर पोहोचला. तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे जोरदार स्वागत केले. जालना रोडच्या दोन्ही बाजूंनी नागरिकांकडून धावपटूंचे हात उंचावून स्वागत केले जात होते. तेव्हा ‘भारतमाता की जय’ असा जयघोष करीत धावपटूदेखील तेवढ्याच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत होते. 

‘लोकमत’च्या प्रवेशद्वारालगत जालना रोडवर धावपटूंच्या स्वागताप्रीत्यर्थ कमान लावलेली होती. बाजूला धावपटूंचे मनोबल उंचाविण्यासाठी ढोल-ताशांचा गजर सुरू होता. कमानीलगत शिक्षक राजेंद्र वाळके यांनी ‘आयुष्य घालवले ज्यांच्यासाठी, त्यांनीच हाकलले घरासाठी’ वृद्ध माता-पित्यांचा सांभाळ करणे हे मुलांचे कर्तव्य आहे, हा संदेश देणारी भव्य रांगोळी रेखाटली, तर एस.टी. महामंडळाच्या लिपिक ज्योती उइके, तसेच विद्यार्थिनी अपर्णा पाटील हिने रेखाटलेल्या पाण्यावर तरंगणाऱ्या आकर्षक रांगोळ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. राज पेट्रोलपंपाच्या बाजूला देसरडा स्कूलच्या चिमुकल्यांनी विविध कवायती सादर करून धावपटूंचा उत्साह द्विगुणित केला. 

मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्यांमध्ये वयाचे बंधन नसते, असे म्हणतात अगदी तसेच आज आजोबापासून नातवांपर्यंत सर्व वयोगटांतील धावपटू तेवढ्याच जिद्दीने धावताना दिसले. यावर्षी धावपटूंच्या वाढलेल्या संख्येवरून ‘लोकमत’ मॅरेथॉनच्या माध्यमातून फिटनेचा संदेश शहरवासीयांमध्ये चांगलाच रुजला असल्याचा प्रत्यय आला. ‘लोकमत भवन’, जालना रोडवर धावपटूंची हरतºहेची काळजी घेतली जात होती. धावपटूंना पाणी, स्फूर्ती आणि ऊर्जा वाढविणारे शरबत, बिस्किटे, खजूर देण्यासाठी स्वयंसेवक रस्त्याच्या कडेला उभे होते. धावपटूंना प्रथमोपचाराची गरज भासलीच, तर रुग्णवाहिकाही ठिकठिकाणी तैनात होत्या.

या शाळांचाही सहभाग
महामॅरेथॉनच्या मार्गात कडा कार्यालय परिसरात ज्ञानप्रकाश विद्यामंदिर, एसबीआय कॉर्नर येथे धर्मवीर संभाजी स्कूल, हिमायत बागेजवळ भाई उद्धवराव पाटील चौकात भाई उद्धवराव पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या लेझीम, ढोल पथकांनी धावपटूंचे मनोबल वाढविले.

Web Title: Unique power to the runners by the citizens, students and songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.