योग आणि संगीतातील अनोखे साधर्म्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:10 PM2019-06-21T12:10:39+5:302019-06-21T12:17:21+5:30
योगायोग असा की, २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन आणि जागतिक संगीत दिवस म्हणून ओळखला जातो.
- रुचिका पालोदकर
औरंगाबाद : भारतीय शास्त्रीय संगीत आणि योग साधना यांचे अनन्यसाधारण महत्त्व आज साऱ्या जगाने मान्य केले आहे. म्हणूनच पाश्चात्त्यांनी जशी योगसाधना जाणून घेतली, तसेच भारतीय शास्त्रीय संगीताची उपासना करणारेही विदेशात अनेक आहेत. योगायोग असा की, २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन आणि जागतिक संगीत दिवस म्हणून ओळखला जातो. आध्यात्मिक समाधान, आत्मानंद आणि मन:शांती मिळवून देणारे योग आणि शास्त्रीय संगीतात साधर्म्य असून, या दोन्ही गोष्टी साधनेतूनच साध्य होतात, असे मत गायक मंडळी, योगतज्ज्ञांनी व्यक्त केले.
गायनातील रियाज, सूर लावणे या गोष्टी आणि प्राणायाम यात खूप समानता आहे. दोन्ही गोष्टी श्वासावर नियंत्रण करणाऱ्या आहेत. योग आणि शास्त्रीय संगीत या दोन्ही गोष्टी म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे. योगा आणि संगीतातून शरीर आणि मनाचा विकास होतो, असे मानले जाते. संगीताचा रियाज आणि योग साधना करण्यासाठीच्या वेळांमध्येही साधर्म्य आहे. या दोन्ही गोष्टी शक्यतो पहाटे कराव्यात, असे सांगितले जाते. संगीत आणि योग साधना यांच्यातील साधर्म्य काही प्राचीन ग्रंथातही सांगितलेले आहे. काही गायक सांगतात की, शास्त्रीय संगीतात ब्रह्मनाद हा एक प्रकार आहे जो नाद योगातून साध्य केला जाऊ शकतो. नाद योगाचा थेट संबंध श्वासाच्या निरंतरतेवर आहे. नाद योग ही संगीत क्षेत्रातील योग कला आहे. यामध्ये सूर लावताना नाभीवर दाब पडतो आणि हा प्रकार थेट कपालभाती प्राणायामाशी संबंधित आहे. योगाचा उद्देश एकाग्रता मिळविणे हा आहे आणि संगीतातूनही मानसिक स्थिरता मिळते.
प्राचीन ग्रंथातही उल्लेख
पं. रामामात्य यांनी १५५० या साली ‘स्वरमेल कलानिधी’ हा ग्रंथ लिहिला आहे. यामध्ये एका श्लोकातून योग साधना आणि संगीत यातील साधर्म्य सांगण्यात आले आहे. योग हे मूळत: शरीराच्या आणि प्राणायामच्या माध्यमातून हृदयाशी संबंधित आहे. आपल्या हृदयात २२ नाड्या असतात आणि या प्रत्येक नाडीतून निर्माण होणारा नाद वेगवेगळा असतो. तसेच भारतीय शास्त्रीय संगीतात २२ श्रुती सांगितल्या आहेत. या श्रुती जगभरात इतर कोणत्याही संगीतात नाहीत. जगभर फक्त ७ स्वरच मानण्यात येतात; पण आपल्याकडे या श्रुतींना खूप महत्त्व आहे. श्रुती म्हणजे स्वराचा अतिसूक्ष्म भाग. या प्रत्येक श्रुतीतून उत्पन्न होणारा नादही भिन्न असतो. त्यामुळे भारतीय शास्त्रीय संगीत आणि योग यांचा खरोखरच खूप जवळचा संबंध आहे. शिवाय आम्ही गायकही सूर लावतो म्हणजेच श्वासावर नियंत्रण करतो आणि हेच तर सगळे प्राणायाममध्ये शिकविले जाते. योग आणि संगीत या दोन्हींना आपण कलाही म्हणू शकतो आणि साधनाही म्हणू शकतो कारण या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी साधना करणे गरजेचे आहे. योग आणि संगीतातून शरीर आणि मनाला बळ मिळते, तसेच जीवन जगण्याची कला कळते.
- डॉ. वैशाली देशमुख (गायिका)
वर्तमानात जगायला शिकवतात योग आणि संगीत
भारतीय शास्त्रीय संगीत आणि योगसाधना या दोन्ही वर्तमानकाळात जगायला शिकविणाऱ्या आहेत. संगीत आणि योगामुळे तणावापासून पूर्णपणे मुक्ती मिळते. या दोन्ही गोष्टी करताना आपण त्यात रममाण होऊन जातो आणि भविष्याची चिंता तसेच भूतकाळातल्या त्रासदायक गोष्टी नकळतपणे विसरून जातो. संगीत आणि योगसाधना या दोन्ही गोष्टींचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊन यातून शारीरिक आणि मानसिक विकास होतो. - डॉ. उत्तम काळवणे
योग आणि संगीत वाढवते कार्यक्षमता
योग आणि संगीत या दोन्ही गोष्टी कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतात. कार्यक्षमता वाढावी आणि मानसिक स्वास्थ्य लाभावे म्हणून आज अनेक कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी खास योग वर्गाचे आयोजन केले जाते. हीच गोष्ट संगीत क्षेत्राबाबतीत पण लागू पडते. शास्त्रीय संगीतामुळे झाडांची वाढही जोमात होते, असे काही अभ्यासकांनी मांडले आहे. याशिवाय आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठीही या दोन्ही गोष्टी सारख्याच उपयुक्त ठरतात. - नीरज वैद्य
बासरी वादनातूनच होते प्राणायाम
योग दिनानिमित्त आयोजित कोणताही मोठा कार्यक्रम असेल, तर त्याला बासरीचे पार्श्वसंगीत दिले जाते. ते एवढ्यासाठीच की, योगाभ्यासात ध्यान लावण्याची जी पद्धत सांगितली जाते, त्यामध्ये मन एकाग्र होऊन आत्म्याचा परमात्म्याकडे प्रवास होणे गरजेचे असते. या प्रवासात माध्यम म्हणून बासरी कार्य करते. मन शांत आणि एक ाग्र करणे हे योगा आणि बासरीवादनातले सगळ्यात मोठे साम्य आहे. याशिवाय प्राणायाम प्रकारात मोठा श्वास घेऊन तो नियंत्रित पद्धतीने बाहेर सोडायचा असतो. हेच तंत्रज्ञान बासरीवादकाला प्रत्येक ओळीमध्ये अवलंबावे लागते. हा एक प्रकारचा प्राणायामच असतो. त्यामुळे बासरी वादकाने प्राणायाम नाही केला तरी त्याचा या पद्धतीतून आपोआपच प्राणायाम होतो. - गिरीश काळे (बासरीवादक)
आत्मिक समाधान देणारे संगीत आणि योग
योगासनात सांगितलेले प्राणायाम आणि संगीतामधले प्रयोग या दोन्ही गोष्टींमध्ये बरेच साधर्म्य आहे. योगातील प्राणायाम या प्रकारात श्वासावर नियंत्रण करून लक्ष केंद्रित केले जाते. हाच प्रकार संगीतातील स्वर लावणे या प्रकाराशी मिळताजुळता आहे. योग्य जागी आणि योग्य तेवढा वेळ स्वर लावतानाही गायकाला श्वास नियंत्रित ठेवावा लागतो. दुसरे म्हणजे ओंकार हा प्रकार योगातही आहे आणि संगीतातही आहे, जशी प्राणायाम करण्यास सुरुवात करण्यापूर्वी ओंकार लावला जातो, तसेच रियाज सुरू करण्याआधी गायक ओंकार म्हणतात. योगामधील भ्रामरी हा प्राणायामचा प्रकार मुखबंदी या संगीतातील प्रकाराशी साधर्म्य साधणारा आहे. योग आणि संगीत या दोन्ही गोष्टींमधून निश्चितच आत्मिक समाधान मिळते. - पं. विश्वनाथ ओक