बिया गोळा करण्याचा जोपासला अनोखा छंद
By Admin | Published: May 13, 2017 09:42 PM2017-05-13T21:42:40+5:302017-05-13T21:44:45+5:30
बीड :बीडमध्ये मात्र, तीन बालमित्र वेगळ्याच कामात व्यस्त आहेत. दुष्काळावर मात करण्यासाठी वर्गशिक्षकाकडून प्रेरणा घेत हे त्रिकूट बिया गोळा करत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शाळा, शिकवणी व अभ्यास यामुळे वर्षभर व्यस्त असलेल्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीची प्रचंड उत्सुकता असते. धम्माल मस्ती, मौजमजा, आंब्यावर ताव अन् तासन्तास मैदानावर घालवत सुटीचा मनसोक्त आनंद लुटण्याचा बहुतांश बच्चेकंपनीचा बेत असतो. बीडमध्ये मात्र, तीन बालमित्र वेगळ्याच कामात व्यस्त आहेत. दुष्काळावर मात करण्यासाठी वर्गशिक्षकाकडून प्रेरणा घेत हे त्रिकूट बिया गोळा करत आहेत. या अनोख्या उपक्रमातून सुटीचा सदुपयोग कसा करता येतो हे त्यांनी दाखवून दिले आहे.
ऋषिकेश देशपांडे, नंदन कुलकर्णी व गौरव देशपांडे अशी या तीन दोस्तांची नावे. बीडमधील चंपावती विद्यालयात शिकणाऱ्या ऋषीकेशने सातवी तर नंदन व गौरवने अनुक्रमे आठवीची परीक्षा दिली आहे. तिघेही पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. अभ्यासात हुशार असलेल्या या तिघांवर शिक्षक रमेश जाधव यांचा प्रचंड प्रभाव आहे. जाधव हे वृक्षमित्र म्हणून ओळखले जातात. ५ सप्टेंबर २०१६ पासून ते रोज एक झाड लावतात. शेवटच्या श्वासापर्यंत ‘एक दिवस- एक वृक्षारोपण’ असा संकल्प त्यांनी स्वीकारलेला आहे.
उन्हाळी सुटीत मौजमजा तर करायचीच, पण सोबत शिक्षक जाधव यांच्याप्रमाणे वृक्षारोपणासाठी काही तरी विधायक उपक्रम हाती घेण्याचा संकल्प त्यांनी केला. ऋषीकेश देशपांडे याने बिया गोळा करुन पहिल्या पावसानंतर त्याची लागवड करण्याची कल्पना मांडली. ती नंदन कुलकर्णी व गौरव देशपांडे याने उचलून धरली. महाराष्ट्र दिनापासून हे तिघे बिया जमा करण्याच्या कामाला लागले. गल्लीतील प्रत्येक घरी जाऊन ते बिया जमा करतात. शिवाय नातेवाईक व मित्रपरिवारालाही ते बिया उपलब्ध करण्याची मागणी करत आहेत. ‘दुष्काळावर मात करुया’ या शिर्षकाखाली त्यांनी पत्रक छापून गल्लीतील भिंतीवर डकवले. त्यामुळे लोक आता स्वत:हून त्यांना बिया आणून देत आहेत. तिघांचे कुटुंबही त्यांना या कामी सहकार्य करत असून वृक्षारोपणासाठी त्यांनी सुरु केलेल्या या उपक्रमाचे त्यांनाही मोठे अप्रूप वाटते.