महाशिवरात्रीत अनोखा विवाह; रात्री १२ वाजता २० फूट खोल बारवेत लागणार शिव-पार्वतीचे लग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2022 07:53 PM2022-03-01T19:53:02+5:302022-03-01T19:53:14+5:30
जुन्या भावसिंगपुऱ्यात प्राचीन श्री सत्येश्वर शिव-पार्वती मंदिर आहे. हे मंदिर चक्क बारवेत आहे.
- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : सगळ्यांपेक्षा आपले लग्न जरा हटके असावे, अशी काही नवरदेव व नवरीची इच्छा असते. यामुळे कोणी विमानात लग्न लावतात तर कोणी चोहीबाजूने अथांग समुद्रात आलिशान क्रूझवर लग्न लावतात. मात्र भावसिंगपुऱ्यात महाशिवरात्रीला मध्यरात्री १२ वाजेच्या मुहूर्तावर चक्क जमिनीपासून २० फूट खोल बारवेत एक अनोखा लग्नसोहळा पार पडणार आहे.
‘बारवेत लग्न’; तेही रात्री १२ वाजता; हे वाचून आपणास नवल वाटले असेल. पण अहो, हा लग्न सोहळा कोणा पुरोगामी, सुधारणावादी किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांचा नाही. तर साक्षात देवांचे देव महादेव व पार्वती यांचा आहे. जुन्या भावसिंगपुऱ्यात प्राचीन श्री सत्येश्वर शिव-पार्वती मंदिर आहे. हे मंदिर चक्क बारवेत आहे. ३४ पायऱ्या उतरून गेल्यावर बारवेत पाणी लागते. त्याआधी १८ व्या पायरीवर भगवान शंकर व देवी पार्वती यांचे समोरासमोर मंदिर आहे. महाशिवरात्रीला मध्यरात्री १२ वाजता येथे शिव-पार्वतीचे लग्न लावण्यात येणार आहे.
वऱ्हाडी मंडळी म्हणजे परिसरातील रहिवासी असणार आहेत. भाविक हातात अक्षता घेऊन उभे असतील. देवी पार्वतीला अलंकाराने सजविण्यात येईल. महादेवाला मुंडावळ्या बांधण्यात येतील. अंतरपाट धरण्यात येईल. मंगलाष्टक म्हणण्यात येईल. शहनाई-चौघडा वाजविला जाईल. फटाक्यांची आतषबाजी होईल. चोहीबाजूने अंधार व बारवेत लख्ख प्रकाशात हा लग्न सोहळा डोळे दीपवून टाकणार ठरेल. यासाठी बारवेला व मंदिराला रंगरंगोटी करण्यात आली आहे. आदल्या दिवशी मध्यरात्री १२ वाजता गावकऱ्यांनी अभिषेक करून महाशिवरात्री उत्सवाला सुरुवात केली.
देशात तीन ठिकाणी मंदिर
देशात औरंगाबादसह उज्जैन, त्र्यंबकेश्वर या तीन ठिकाणी शिव-पार्वतीचे समोरासमोर मंदिर आहे. त्यातील जुना भावसिंगपुरा येथील मंदिर एकमेव आहे, जे बारवेत आहे. हे मंदिर सुमारे ३५० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. शहरापासून दूर निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे. निजामाच्या सैन्यातील भावसिंग नावाच्या सरदाराने भावसिंगपुरा गाव वसविले. या परिसरात सैनिकांची छावणी उभारली. शिवभक्तांसाठी येथील बारवेत हे मंदिर बांधले, अशी माहिती पुजारी सदाशिव खेळतोंड (वाणी) यांनी दिली.