विद्यापीठाला प्रतीक्षा शासनाच्या निर्देशाची

By | Published: November 22, 2020 09:01 AM2020-11-22T09:01:12+5:302020-11-22T09:01:12+5:30

औरंगाबाद : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाविद्यालये व विद्यापीठातील विभागात ऑनलाईन अध्यापन सुरू आहे. मात्र, महाविद्यालये व विद्यापीठातील ...

University awaits government directive | विद्यापीठाला प्रतीक्षा शासनाच्या निर्देशाची

विद्यापीठाला प्रतीक्षा शासनाच्या निर्देशाची

googlenewsNext

औरंगाबाद : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाविद्यालये व विद्यापीठातील विभागात ऑनलाईन अध्यापन सुरू आहे. मात्र, महाविद्यालये व विद्यापीठातील विभागांमध्ये वर्ग सुरू करण्याबाबत राज्य शासनाकडून अद्याप कोणत्याही मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. शासनाच्या निर्देशानुसारच पुढील निर्णय घेतला जाईल, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट थोपवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पावले उचलली आहेत. सोमवारपासून राज्यातील ९ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा उघडण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र, शाळा सुरू करताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात, अशा सूचना शासनाने केल्या आहेत. मात्र, विद्यापीठाचे कार्यक्षेत्र मोठे आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाऐवजी विद्यापीठ प्रशासनाला शासनाच्या निर्देशांची प्रतीक्षा आहे.

महाविद्यालयांतील प्रथम, द्वितीय व तृतीय पदवी अभ्यासक्रम ऑनलाईन शिकविण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. ऑक्टोबर महिन्यात घेण्यात आलेल्या पदवी अभ्यासक्रम अंतिम सत्राच्या परीक्षांचा अद्याप निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे पदव्युत्तर प्रथम वर्गाचे प्रवेश झालेले नाहीत. सध्या विद्यापीठ परिसर व महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अध्यापन केले जात आहे.

चौकट....

राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने घेतला आढावा

प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांनी सांगितले की, यूजीसीच्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार पदवीच्या तीनही वर्गांचा व पदव्युत्तर द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम ऑनलाईन शिकविण्याच्या सूचना विद्यापीठ परिसरातील विभाग व महाविद्यालयांना दिलेल्या आहेत. दुसरीकडे नुकताच राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने ऑनलाईनच्या माध्यमातून किती अभ्यासक्रम पूर्ण झाला व अन्य काही बाबींचा आढावा घेतला आहे. त्यामुळे महाविद्यालये व विद्यापीठांबाबत शासनाच्या हालचाली दिसून येत आहेत. शासनाचे निर्देश प्राप्त होताच, त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाईल.

Web Title: University awaits government directive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.