विद्यापीठ बोगस नोकरभरती; रंजना जगदाळे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 12:57 AM2017-09-05T00:57:57+5:302017-09-05T00:57:57+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दहा लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी विद्यापीठातील वरिष्ठ सहायक रंजना जगदाळे हिला सोमवारी (दि़ ४) पोलिसांनी अटक केली़
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दहा लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी विद्यापीठातील वरिष्ठ सहायक रंजना जगदाळे हिला सोमवारी (दि़ ४) पोलिसांनी अटक केली़ न्यायालयाने तिला ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजाला अल अमुदी यांनी हे आदेश दिले़
हडकोतील रहिवासी सचिन सूर्यभान पाचकर (३७) यांनी याविषयी सिटीचौक ठाण्यात फिर्याद नोंदविली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार आणि त्यांची सासू मनीषा वैद्य हडको परिसरात राहतात. आरोपीने विद्यापीठात शिपाई पदाच्या जागा निघाल्या आहेत. तुमच्या जावयास नोकरी लावून देते, असे तिने सांगितले होते. यानंतर तक्रारदार हे आरोपी जगदाळे यांना भेटले असता त्यांनी नोकरीसाठी दहा लाख रुपये लागतील असे सांगितले. तिच्या सांगण्यावर विश्वास ठेवून पाचकर आणि त्यांचे नातेवाईक २०१५ मध्ये आरोपी जगदाळेच्या घरी गेले़ तेथे नोकरीसंदर्भात चर्चा करून सुरुवातीला पाच लाख आणि नंतर पाच लाख रुपये देण्याचे ठरले़
१० जून २०१५ रोजी पाचकर यांनी आरोपी जगदाळेच्या घरी जाऊन तिचा पती बाळासाहेब यांच्या हातात ५ लाख रुपये दिले़ आॅगस्ट २०१५ मध्ये आरोपीने पाचकर यांना विद्यापीठात बोलावून तात्पुरत्या स्वरुपात विद्यापीठातील एका विभागात काम करायला लावले़ आॅक्टोबर २०१५ मध्ये पुन्हा पाच लाख रुपये आरोपी रंजना हिला दिले़ त्यानंतर पाचकर यांनी नोकरीसाठी आरोपीकडे तगादा लावला असता तिने १० मे २०१६ रोजी विद्यापीठाच्या लेटर पॅडवर निवड यादीचा २०१६/१०६३ असा आवक जावक क्रमांक असलेला शिपाई आणि कनिष्ठ लिपिकपदाची निवड यादी दाखविली आणि तुमची एक महिन्यानंतर वैद्यकीय तपासणी होईल. त्यानंतर तुम्हाला नोकरीवर रुजू करण्यात येईल असे सांगितले़ महिना उलटला तरी वैद्यकीय तपासणी न झाल्याने पाचकर यांनी आरोपीकडे विचारणा केली असता वैद्यकीय तपासणी पुढे ढकलण्यात आल्याचे सांगून टाळाटाळ केली़
पाचकर यांना संशय आल्याने त्यांनी विद्यापीठात चौकशी केली असता लेटर पॅॅडवर दिलेला आदेश बनावट असल्याचे समोर आले़ याविषयी १४ जून रोजी सिटीचौक ठाण्यात त्यांनी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तपास करून आरोपी रंजना जगदाळे हिला सोमवारी (दि़ ४) सकाळी अटक केली.