विद्यापीठाच्या समितीची पुण्यात बैठक
By Admin | Published: October 9, 2016 12:43 AM2016-10-09T00:43:46+5:302016-10-09T01:07:15+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नेमलेल्या एका चौकशी समितीच्या बैठका पुण्यामध्ये घेण्यात येत असल्याने विद्यापीठ वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नेमलेल्या एका चौकशी समितीच्या बैठका पुण्यामध्ये घेण्यात येत असल्याने विद्यापीठ वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राबाहेर बैठका घेण्याचे प्रयोजन काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
विद्यापीठाच्या फंडातून नेमलेल्या प्राध्यापकांच्या नियुक्त्या नियमित करण्यासाठी विद्यापीठाने शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावाला डॉ. बाबासाहेब भालेराव यांनी विरोध दर्शविला होता. तसेच या प्राध्यापकांना नियमबाह्यरीत्या वेतनवाढ देण्यात आल्याचा आक्षेप घेऊन विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर जुलै महिन्यात उपोषणही केले होते. याप्रकरणी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. एन. मालदार, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आर. एस. माळी आणि शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांची चौकशी समिती नेमली होती. या समितीची पहिली बैठक विद्यापीठात १९ जुलै रोजी झाली. ६ आॅगस्ट रोजी समितीची दुसरी बैठक पुण्यात झाली. गुरुवार, ६ आॅक्टोबर रोजी समितीची तिसरी बैठक पुण्यातच झाली. या बैठकीला विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे गेले होते.
चौकशी समितीच्या बैठका पुण्यामध्ये कशासाठी घेण्यात येत आहेत, असा प्रश्न डॉ. भालेराव यांनी उपस्थित केला आहे. विद्यापीठातील अधिकाऱ्यांमध्येही या प्रकारामुळे नाराजी आहे. विद्यापीठाने नेमलेली चौकशी समिती असेल तर समितीच्या बैठका विद्यापीठातच व्हायला हव्यात, असे मत व्यक्त केले. यासंदर्भात डॉ. भालेराव यांनी डॉ. जब्दे यांची भेट घेतली असता त्यांनी बैठक पुण्यात घेण्याचे कारण स्पष्ट केले नसल्याचे भालेराव म्हणाले.
दरम्यान, विद्यापीठाच्या फंडातून नेमलेल्या प्राध्यापकांच्या नियुक्तीपोटी विद्यापीठाला दरमहा सुमारे २५ लाख रुपयांचा भुर्दंड बसत असल्याची माहिती मिळाली.