कौशल्य विद्यापीठाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:26 AM2018-07-16T00:26:25+5:302018-07-16T00:28:38+5:30
शेती आणि शेतीवर आधारित ग्रामीण भागातील उद्योग वाढीसाठी मराठवाड्यात कौशल्य विद्यापीठाची शासनाकडे मागणी केली आहे. याद्वारे दहा लाख युवक-युवतींना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण, कृषी संवर्धन, मत्स्य व्यवसाय, रेशीम यासह शेतीबरोबर निगडित उद्योग वाढीवर भर दिला जाईल, असे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर रविवारी ‘रुरल चेंबर आॅफ कॉमर्स’च्या उद््घाटनप्रसंगी म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शेती आणि शेतीवर आधारित ग्रामीण भागातील उद्योग वाढीसाठी मराठवाड्यात कौशल्य विद्यापीठाची शासनाकडे मागणी केली आहे. याद्वारे दहा लाख युवक-युवतींना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण, कृषी संवर्धन, मत्स्य व्यवसाय, रेशीम यासह शेतीबरोबर निगडित उद्योग वाढीवर भर दिला जाईल, असे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर रविवारी ‘रुरल चेंबर आॅफ कॉमर्स’च्या उद््घाटनप्रसंगी म्हणाले.
ग्रामीण भागात नवीन उद्योग उभारले जावेत, नवीन उद्योजक निर्माण करणे, यादृष्टीने माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी रुरल चेंबर आॅफ कॉमर्सची स्थापना करण्यात आली आहे. एमजीएम परिसरातील रुख्मिणी सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. भापकर यांच्या हस्ते उद््घाटन झाले. एमआयटीचे अध्यक्ष यज्ञदेव कवडे अध्यक्षस्थानी होते. अखिल भारतीय हरिजन सेवक संघाचे डॉ. शंकरकुमार सन्याल, माजी खासदार नरेश यादव, रुरल चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष अतुल घुईखेडकर, उपाध्यक्ष प्रदीप देशमुख, उद्योजक अखिलेश कटियार, राम जोगदंड, शिवाजी झोंबाडे, डॉ. अभय पाटील, राजेंद्र गावित, डॉ. विजय माने यांची उपस्थिती होती.
डॉ.भापकर म्हणाले, ज्ञानाबरोबर कौशल्य आणि तंत्रज्ञान असणे गरजेचे आहे. ज्याच्याकडे या तिन्ही गोष्टी नाहीत, तो मागे पडतो. त्यामुळे या तिन्ही गोष्टी देण्याची आज गरज आहे. नॉलेज, कॉलेज आणि व्हिलेज हा एक उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीचे ज्ञान, विविध योजना, स्वयंरोजगाराच्या योजना आदींविषयी मार्गदर्शन केले जाते. ग्रामीण उद्योग वाढीसाठी उत्पादन, मार्केटिंग आणि प्रक्रिया या गोष्टींना बळ दिले पाहिजे. शासनाकडे मराठवाड्यासाठी १ हजार गटशेतीचे उद्दिष्ट देण्याची मागणी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. सन्याल म्हणाले, खेडी पुढे गेली पाहिजे, असे महात्मा गांधी म्हणत होते. परंतु खेड्यातून लोक शहरात येतात. त्यामुळे गांधीजींचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी आता कुठेतरी पाऊल पडत आहे.
ब्रँड, मार्केटिंग, समन्वयाचा अभाव
डॉ. विजय माने म्हणाले, ग्रामीण भागातील उद्योगांना उत्पादनापेक्षा ब्रॅडिंगवर अधिक खर्च करावा लागतो. तो अनेकांना शक्य होत नाही. ब्रँडसह मार्केटिंग, समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे या तिन्ही गोष्टींवर मात करून ग्रामीण भागात समृद्धी आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
बेरोजगारवाद धोकादायक
दरवर्षी हजारो विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडतात. परंतु नोकरी मिळत नाही. दहशतवाद, नक्षलवादापेक्षा बेरोजगारवाद हा अधिक धोकादायक आहे. ग्रामीण भागात एमआयडीसीचे उद्योग नाहीत. ग्रामीण भागात उद्योग वाढीसाठी युवकांची मानसिकता बदलली पाहिजे, असे अतुल घुईखेडकर म्हणाले.