विद्यापीठातील विभागांना नवीन विद्यार्थीच मिळेनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 07:45 PM2019-08-05T19:45:14+5:302019-08-05T19:47:50+5:30
रिक्त जागांवर सीईटीशिवाय ९ आॅगस्टपर्यंत प्रवेश
औरंगाबाद : डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध विभागांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्यामुळे अनेक जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने दुसऱ्यांदा प्रवेशाला मुदतवाढ दिली आहे. ९ आॅगस्टपर्यंत आता प्रवेश घेता येणार आहेत.
‘प्रवेशपूर्व परीक्षा’ (सीईटी) न दिलेल्या विद्यार्थ्यांनाही संबंधित विभागात अर्ज, कागदपत्रे दाखल करून प्रवेश देण्यात येईल. विद्यापीठातील मुख्य परिसर व उस्मानाबाद उपपरिसरातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी गेल्या महिन्यात प्रवेशपूर्व परीक्षा सीईटी घेण्यात आली. पदवी अभ्यासक्रमाचे निकाल लावण्यास विलंब झाल्याने प्रवेश प्रक्रिया लांबली होती़ तीन टप्पे होऊनही काही विभागात जागा रिक्त राहिल्या होत्या.
यासंदर्भात मुदत वाढविण्याची मागणी काही विभागप्रमुख, विद्यार्थ्यांनी केली होती. यानंतर कुलगुरू डा़ॅ प्रमोद येवले यांनी रिक्त जागांवर इच्छुक विद्यार्थ्यांनाही प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत. नव्या बदलानुसार ९ आॅगस्टपर्यंत प्रवेश देण्यात येणार आहे. १० आॅगस्ट रोजी विभागप्रमुखाना कुलगुरूंकडे अहवाल सादर करावे लागणार आहेत़ विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरील फॉर्म व कागदपत्रांसह संबंधित विभागात संपर्क साधण्याचे आवाहन पदव्युत्तर विभागातर्फे कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी केले आहे.
नव्या परिपत्रकातील मुद्दे
ज्या विभागातील पदव्युत्तर प्रवेशासाठी व एम.फिल. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाची जागा रिक्त असेल अशा शैक्षणिक विभागप्रमुखांनी सदरील रिक्त जागेवर ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व परीक्षा दिलेली आहे, अशा विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य देऊन शासनाच्या आरक्षण धोरणानुसार व विद्यापीठाच्या प्रवेशाविषयीच्या नियमानुसार प्रवेश दिले जावेत.ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व परीक्षा दिलेली नसेल तर अशा विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षा न घेता संबंधित विद्यार्थ्यांच्या पदवी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणानुसार गुणवत्ता यादी तयार करून या रिक्त जागा गुणानुक्रमे भरण्यात याव्यात.
विभागातील पदव्युत्तर व एम.फिल. या अभ्यासक्रमांसाठी शासनाने व विद्यापीठाने निश्चित केलेल्या प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त जागेवर कोणत्याही विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये. विद्यार्थ्यांचा वाढीव जागेवर अथवा वाढीव कोट्यातून प्रवेश देण्याबाबतचा अर्ज विद्यापीठ प्रशासनाकडे पाठविण्यात येऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत.