विद्यापीठाला स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानाचा पडला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 07:02 PM2018-09-18T19:02:41+5:302018-09-18T19:04:01+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मागील अनेक वर्षांपासून हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त प्रशासनातर्फे लढ्यात सहभाग घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा विशेष सन्मान केला होता.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मागील अनेक वर्षांपासून हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त प्रशासनातर्फे लढ्यात सहभाग घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा विशेष सन्मान केला होता. मागील अनेक वर्षांपासून ही परंपरा सुुरू होती. ती यावर्षी खंडित झाली आहे. विद्यापीठ प्रशासनाने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या जालना जिल्ह्यात एका खाजगी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास प्राधान्य दिले. यामुळे स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान केला नसल्याची माहिती समोर आली आहे.
विद्यापीठात मागील काही वर्षांपासून हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त या लढ्यात सहभागी मान्यवर स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्याची परंपरा आहे. प्रत्येक वर्षी पाचपेक्षा अधिक स्वातंत्र्यसैनिकांना बोलावण्यात येते; मात्र यावर्षी राज्यपाल सी. विद्यासागर राव हे गणेश नेत्रालयाचा रौप्य महोत्सव आणि बद्रीनारायण बारवाले यांच्या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी जालन्यात येणार होते. या दोन्ही कार्यक्रमांशी विद्यापीठ प्रशासनाचा दुरान्वयानेही संबंध नाही. तरीही कुलगुरू, प्रकुलगुरूंसह प्रशासन जालन्यात राज्यपालांच्या कार्यक्रमाला हजर राहिले.
याशिवाय कुलगुरूंच्या आदेशानुसार व्यवस्थापन परिषद सदस्यांनाही राज्यपालांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यामुळे विद्यापीठात मागील अनेक वर्षांपासून स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्याची परंपरा खंडित झाली आहे. याबद्दल मराठवाडाप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.
कुलगुरूंच्या हस्ते झाले ध्वजारोहण
विद्यापीठात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे आदींची उपस्थिती होती. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त प्रत्येक वर्षी स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्यात येतो. मात्र यावर्षी राज्यपालांच्या कार्यक्रमाला विद्यापीठातील महत्त्वाचे अधिकारी उपस्थित राहणार असल्यामुळे ध्वजारोहणानंतर केवळ कुलगुरू साहेबांचे मार्गदर्शन ठेवले होते.
-डॉ. मुस्तजिब खान, विद्यार्थी कल्याण संचालक