शिष्यवृत्ती देण्यात विद्यापीठ अग्रेसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2016 12:19 AM2016-07-24T00:19:08+5:302016-07-24T00:52:41+5:30
औरंगाबाद : सर्वाधिक संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देणारी संस्था अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची ओळख निर्माण झाली आहे.
औरंगाबाद : सर्वाधिक संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देणारी संस्था अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची ओळख निर्माण झाली आहे. अनुसूचित जाती- जमाती, इतर मागासवर्ग, अल्पसंख्याक, सर्वसाधारण गुणवत्ताधारक, शेतकरी कुटुंबातील पाचशे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ होत आहे.
विद्यापीठात शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या घटकांमधील विद्यार्थी आहेत. आर्थिक पाठबळाअभावी उच्च शिक्षणामध्ये अनेक विद्यार्थी संशोधन करू शकत नाहीत, अशी स्थिती आहे. अनुसूचित जाती- जमातीमधील पीएच. डी. आणि एम. फिल. करणाऱ्या विद्यार्थ्यांना राजीव गांधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती केंद्र सरकारकडून दिली जाते. त्याचप्रमाणे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना मौलाना आझाद राष्ट्रीय शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यापीठाच्या विविध विभागांतील ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळत असल्याची माहिती मिळाली. यामध्ये विज्ञान, सामाजिक शास्त्रे व व्यावसायिक अभ्यासक्रम, अशा सर्व विद्याशाखांचे विद्यार्थी आहेत. २५ हजार रुपये ते २८ हजार रुपये, अशी ही शिष्यवृत्ती मिळते. याशिवाय पोस्ट डॉक्टरल फेलोशिप, केंद्र सरकारचा विज्ञान तंत्रज्ञान विभाग, बार्टी आदी संस्थांकडून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत आहे.