विद्यापीठ अधिसभा निवडणूक :मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत हाय व्होल्टेज ड्रामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:48 AM2017-11-28T00:48:46+5:302017-11-28T00:48:50+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रात मध्यरात्री १२ वाजेपासून ते ४ वाजून १५ मिनिटांपर्यंत ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ अनुभवायला मिळाला.
राम शिनगारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रात मध्यरात्री १२ वाजेपासून ते ४ वाजून १५ मिनिटांपर्यंत ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ अनुभवायला मिळाला. आरक्षित प्रवर्गात एका केंद्रावरील मतपत्रिका मोजल्या नसल्याचा आक्षेप घेतल्यामुळे विद्यापीठ विकास मंच आणि उत्कर्ष पॅनलचे प्राध्यापक उमेदवार समोरासमोर भिडले. शेवटी पोलिसांच्या तीन गाड्या आणि बंदूकधारी ब्लॅक कमांडोंना पाचारण करावे लागले. यानंतर पहाटे सव्वाचार वाजता पुन्हा मतमोजणीला सुरुवात झाली.
विद्यापीठाच्या अधिसभेसाठी संस्थाचालक, प्राचार्य, विद्यापीठ प्राध्यापक, महाविद्यालयीन प्राध्यापक आणि विद्या परिषदेसाठी शुक्रवारी (दि.२४) मतदान झाले. या मतदानाच्या मतमोजणीला रविवारी (दि.२६) सकाळी १० वाजता सुरुवात झाली. रात्री सहा वाजेपर्यंत संस्थाचालक, प्राचार्य आणि विद्यापीठ प्राध्यापक गटाची मतमोजणी सुरळीतपणे पार पडली. सायंकाळी ७ वाजेपासून महाविद्यालयीन प्राध्यापक गटातील अनुसूचित जाती प्रवर्गातील मतमोजणीला प्रारंभ झाला. यात विद्यापीठ विकास मंचचे डॉ. शंकर अंभोरे आणि उत्कर्षचे डॉ. बाबासाहेब कोकाटे यांच्यामध्ये जोरदार चुरस निर्माण झाली; मात्र शेवटच्या टप्प्यात तिसºया उमेदवाराची द्वितीय पसंतीची मते मोजल्यानंतर डॉ. कोकाटे यांना विजयी घोषित केले. यानंतर अनुसूचित जमाती, ओबीसी, व्हीजेएनटी-१ आणि महिला गटातील मतमोजणी झाली. यातील अनुसूचित जाती व जमाती गटातील उमेदवारांना विजयी घोषित केले; मात्र डॉ. शंकर अंभोरे यांचा पराभव झाल्याचे जाहीर होताच उत्कर्ष पॅनलच्या समर्थकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत जोरदार घोषणाबाजी केली. तेव्हाच दोन्ही गट प्रशासकीय इमारतीसमोर भिडण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती; मात्र अनर्थ टळला. यानंतर उर्वरित आरक्षित गटातील मतमोजणीत सर्वच उमेदवार उत्कर्ष पॅनलचे निवडून येत होते. याच्या परिणामी दोन्ही गटांतील तणाव वाढत चालला होता. आरक्षित प्रवर्ग संपताच खुल्या प्रवर्गातील मतमोजणीला मध्यरात्री १२ वाजेनंतर सुरुवात झाली; मात्र एकूण मतपत्रिकेत ८३ मतपत्रिका कमी पडत असल्याचे स्पष्ट झाले. यावर बामुक्टोचे उमेदवार डॉ. विक्रम खिलारे यांनी सर्व मतपत्रिका आल्याशिवाय कोटा ठरविण्यास विरोध दर्शविला. तेव्हा एका कोपºयातील मतपेटीतून ८३ मते काढण्यात आली. याचवेळी आरक्षित प्रवर्गातील पराभूत उमेदवारांनी आक्षेप घेत आमच्या मतमोजणीत या मतांची मोजणी झाली नसल्याचे सांगत ही पेटी बाहेरून कोणीतरी आणून ठेवली असल्याचा आरोप केला. हा आरोप करतानाच सर्व मतमोजणी थांबवत मतदान प्रक्रियाच रद्द करण्याची मागणी केली. यावरून दोन्ही गटांत जोरदार घोषणाबाजी, हमरीतुमरी सुरू झाली. या घोषणाबाजीने उग्र रूप धारण करीत शिवीगाळपासून ते एकमेकांवर धावून जाण्यापर्यंत प्राध्यापक उमेदवारांची मजल गेली, तेव्हा मतमोजणी केंद्रात कुलगुरू उपस्थित नव्हते. खुल्या प्रवर्गातील मतमोजणी थांबलेली होती. यामुळे शेवटी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. साधना पांडे यांनी कुलगुरू जो निर्णय देतील त्यानुसार पुढील काम करणार असल्याचे सांगितले. कुलगुरूंना मतमोजणी केंद्रात आणण्यासाठी गाडी पाठविण्यात आली. काही वेळाने कुलगुरू आल्यानंतर हा हाय होल्टेज ड्रामा अधिकच झाला. मतमोजणी थांबवून सर्व प्रक्रिया सील करण्याची मागणी विद्यापीठ विकास मंचच्या उमेदवारांनी केली, तर उत्कर्ष पॅनलच्या उमेदवारांनी कोणत्याही परिस्थितीत मतमोजणी सुरूच झाली पाहिजे, ती थांबवता येणार नसल्याचे सांगितले. सुरुवातीला कुलगुरूंनी मतमोजणी थांबविण्याची भूमिका घेतली होती; मात्र त्यास प्रखर विरोध झाला. शेवटी गोंधळ आवाक्याबाहेर जात असताना दोन वाजता अतिरिक्त पोलीस संरक्षण मागविण्यात आले. गोंधळ आवाक्यात येत नसल्यामुळे बंदूकधारी ब्लॅक कमांडो बोलावण्यात आले. हे कमांडो आल्यानंतर ड्रामा आटोक्यात आला. यानंतर पहाटे ४ वाजून १५ मिनिटांनी मतमोजणीला सुरुवात झाली.
दारूचा महापूर : रस्त्यावरच कार्यक्रम
अधिसभेची मतमोजणी प्रशासकीय इमारतीत सुरू होती. संध्याकाळ होताच काही विजयी, पराभूत उमेदवारांसह समर्थकांनी प्रशासकीय इमारतीसमोरील रस्त्यावरच दारू पिण्याचा कार्यक्रम उरकला.
बाहेर असलेले समर्थक तर दारूच्या नशेत हिरवळीवर, रस्त्याच्या कडेला झोपलेले दिसले. अनेक जण विजयाच्या घोषणा देत होते, तर काही जण अन्याय झाल्यामुळे प्रशासन, कुलगुरूंना शिव्यांची लाखोली वाहत होते. हे शिक्षणाचे केंद्र आहे की दारूड्यांचा अड्डा, असाच प्रश्न उपस्थितांना पडला होता.
भारत खैरनार यांनी बजावली महत्त्वाची भूमिका
मतमोजणी केंद्रात प्रचंड गोंधळ सुरू झाला तेव्हा एकही पोलीस नव्हता. शेवटी आतमधून सूचना आल्यानंतर डॉ. भारत खैरनार यांनी १०० क्रमांकावर फोन लावून पोलिसांना बोलावले.
सुरुवातीला गस्त घालणाºया महिला कॉन्स्टेबल आल्या; मात्र परिस्थिती गंभीर असल्याचे दिसल्याने त्यांनी वॉकीटॉकीवरून अतिरिक्त कुमक मागवली.
४तरीही परिस्थिती नियंत्रणात येत नसल्यामुळे डॉ. खैरनार यांनी थेट पोलीस आयुक्तालय गाठत बंदूकधारी ब्लॅक कमांडो पाठविण्यासाठी निवेदन दिले. त्यानंतर सर्व यंत्रणा हलली.
प्राध्यापकाला मारहाण
प्रशासकीय इमारतीसमोर चार अनोळखी तरुण दारूच्या नशेत आले. त्यांनी त्यांच्या परिचयातील एका प्राध्यापकाला ‘मेरे बहन को छेडता हैं क्या...’ असे म्हणत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या प्राध्यापकाला ते तरुण ओळख विचारत होते; मात्र तो प्राध्यापक सांगत नव्हता. दारूमुळे मारहाण होत असल्याचेही त्याला समजत नव्हते. तब्बल दीड तास बेदम मारहाण केली. शेवटी पोलिसांना माहिती देऊन त्या तरुणांच्या ताब्यातून त्या प्राध्यापकाची सुटका केली. हा प्राध्यापक गंगापूर येथील असल्याचे समजले.