विद्यापीठ व्यवस्थापन परिषद दोन जागांसाठी बिनविरोध निवडणुकीचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 04:18 PM2021-02-04T16:18:08+5:302021-02-04T16:28:42+5:30
दोन्ही गटांत प्रत्येकी एक-एक अर्ज वैध ठरला असून आता केवळ बिनविरोध निवड होण्याची औपचारिकता बाकी आहे.
औरंगाबाद : विद्यापीठाच्या विद्या परिषदेतून व्यवस्थापन परिषदेवर निवडून द्यावयाच्या दोन रिक्त जागांपैकी महिला गटातून एकच नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाला होता, तर पुरुष अध्यापक गटातून एका जागेसाठी ६ अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी मंगळवारी ५ जणांचे अर्ज अवैध ठरले. त्यामुळे दोन्ही गटांत प्रत्येकी एक-एक अर्ज वैध ठरला असून आता केवळ बिनविरोध निवड होण्याची औपचारिकता बाकी आहे.
शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी विद्यापीठाकडे पुरुष गटातून डॉ. विलास खंदारे, डॉ. ई. आर. मार्टिन, डॉ. दादासाहेब गजहंस, डॉ. शांताराम रायपुरे, डॉ. एस. ए. घुमरे, डॉ. किशोर साळवे या सात जणांचे, तर महिला गटातून डॉ. प्रतिभा अहिरे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता. विद्यापीठ कायद्यानुसार विद्या परिषदेत निवडून आलेला उमेदवार हाच व्यवस्थापन परिषदेवर निवडून जाण्यासाठी पात्र असतो. त्यानुसार मंगळवारी प्राप्त अर्जांची छाननी झाली तेव्हा डॉ. विलास खंदारे हे विद्या परिषदेत निवडून गेलेले अध्यापक असल्यामुळे त्यांचा अर्ज वैध ठरला, तर उर्वरित सर्व ५ जण हे विद्या परिषदेवर नामांकनाद्वारे गेलेले आहेत. त्यामुळे त्या पाचही जणांचे अर्ज अवैध ठरले. दरम्यान, महिला गटातून निवडून देण्याच्या जागेसाठी केवळ एकच अर्ज प्राप्त झाला आहे.
४ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यापीठाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे वैध-अवैध अर्जांसंबंधी आक्षेप घेता येईल. ५ फेब्रुवारीला सायंकाळी यासंबंधी निर्णय दिला जाईल. ६ फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. मात्र, रिंगणात प्रत्येकी एकच अर्ज असल्यामुळे त्या दिवशी या दोन्ही जागांसाठी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर होईल असे जरी असले, तरी १२ फेब्रुवारीला आयोजित विद्यापरिषदेच्या बैठकीत डॉ. खंदारे व डॉ. अहिरे यांना निवडून आल्याचे प्रमाणपत्र मिळेल.