पांगरा शिंदेत विद्यापीठाचे पथक
By Admin | Published: July 17, 2017 11:17 PM2017-07-17T23:17:54+5:302017-07-17T23:30:31+5:30
कुरूंदा : वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे गेल्या काही दिवसांपासून भूगर्भातील आवाजामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या गुढ आवाजाचे संशोधन न झाल्यामुळे ग्रामस्थ भीतीमध्ये वावरत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरूंदा : वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे गेल्या काही दिवसांपासून भूगर्भातील आवाजामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या गुढ आवाजाचे संशोधन न झाल्यामुळे ग्रामस्थ भीतीमध्ये वावरत आहेत. या पार्श्वभूमीवर आवाजाची पडताळणी करण्यासाठी सोमवारी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे पथक गावात आले होते. पथकाने खडकाळ भागाची पाहणी व पाणी नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.
भूगर्भातील होणाऱ्या आवाजाचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढले होते; परंतु होणाऱ्या आवाजाचे स्पष्ट कारण अद्याप समजले नव्हते. या आवाजाचे संशोधन करण्याची मागणीही ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली होती. गूढ आवाजाचा उलगडा अद्याप झालेला नव्हता. याचा शोध लावण्यासाठी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या पथकाकडून पाहणी करण्यात आली. ते काय निष्कर्ष काढतील, याकडे लक्ष लागले आहे.