विद्यापीठाला ३२ लाखांचा निधी प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:04 AM2021-06-04T04:04:27+5:302021-06-04T04:04:27+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उद्योजकता व कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आले असून यासाठी ‘औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स’ ...
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उद्योजकता व कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आले असून यासाठी ‘औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स’ या उद्योगाकडून दीड कोटीपैकी ३२ लाखांचा पहिला हप्ता दोन दिवसांपूर्वी विद्यापीठ प्रशासनाला प्राप्त झाला आहे. हा निधी सुरुवातीला फर्निचर व आवश्यक मनुष्यबळावर खर्च केला जाणार असून त्यानंतर मिळणाऱ्या निधीतून हे केंद्र सक्षमपणे चालविले जाणार आहे.
मराठवाड्यातील युवकांना उद्योग व व्यवसायांत करिअर घडविणे, उद्योगांना लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी कौशल्यावर आधारित कोर्सेस सुरू करण्यासाठी उद्योजकता व कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याचा संकल्प कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी केला आहे. यासाठी विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात एक कोटींची तरतूद करण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर या उपक्रमाला गती देण्यासाठी ‘औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स’ या उद्योगाने ‘सीएसआर’ फंडांतर्गत दीड कोटींचा निधी देण्याचा विद्यापीठासोबत करारही केला आहे.
या कराराअंतर्गत पहिल्या टप्प्यात ३२ लाख रुपयांचा धनादेश प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांच्याकडे कंपनीचे उपाध्यक्ष सोमेन मुजुमदार यांनी दोन दिवसांपूर्वी सुपूर्द केला आहे. त्यावेळी वाणिज्यशास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. भालचंद्र वायकर, लेखा व्यवस्थापक प्रमोद अग्रवाल आदींची उपस्थिती होती.
या उद्योगामार्फत चालू आर्थिक वर्षात ८० लाख, तर पुढील दोन वर्षांत प्रत्येकी ३५ लाखांचा निधी देण्यात येणार आहे. दरम्यान, सदरील उद्योजकता कौशल्य विकास केंद्र हे विद्यापीठातील दिनदयाल उपाध्याय केंद्रासाठी उभारण्यात आलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रात विद्यापीठ व उद्योग क्षेत्राच्या समन्वयातून चालू शैक्षणिक वर्षांतच प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहेत, असे अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे यांनी सांगितले.