‘पेट-२’साठी विद्यापीठ संगणकांच्या शोधात; परीक्षा पुढे लांबण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 05:03 PM2021-02-17T17:03:47+5:302021-02-17T17:06:15+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने त्रयस्थ संस्थेमार्फत ३० जानेवारी, २०२१ रोजी ‘पेट-१’ ऑनलाइन पद्धतीने घेतली.
औरंगाबाद : पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा (पेट-२) विद्यार्थ्यांनी घरून न देता ती आता केंद्रावर येऊनच द्यावी लागेल, असा विद्यापीठाने निर्णय तर घेतला, पण आता या ऑनलाइन परीक्षेसाठी हजारो संगणक उपलब्ध करावे लागतील. त्यासाठी विद्यापीठाची डोकेदुखी वाढली असून, एका समितीद्वारे शहरातील विविध महाविद्यालयांकडे किती संगणकांची व्यवस्था होऊ शकते, याचा शोध घेतला जाणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने त्रयस्थ संस्थेमार्फत ३० जानेवारी, २०२१ रोजी ‘पेट-१’ ऑनलाइन पद्धतीने घेतली. ही परीक्षा विद्यार्थ्यांनी घरून दिली होती. या परीक्षेबाबत ‘लोकमत’ने ‘आप्तस्वकीयांच्या मदतीने दिली विद्यार्थ्यांनी पेट’ या मथळ्याखाली बातमी छापली. त्यानंतर विद्यापीठाकडे या परीक्षेच्या पारदर्शकतेबद्दल अनेक तक्रारीही प्राप्त झाल्या. त्या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी, ‘पेट-२’ ही ऑनलाइन परीक्षा विद्यार्थ्यांनी घरून न देता ती केंद्रावर येऊनच द्यावी, असा निर्णय जाहीर केला.
‘पेट-१’चा निकाल १ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत ६ हजार ७७५ विद्यार्थ्यांनी ४५ टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करून ते ‘पेट-२’ला पात्र झाले. आता ही परीक्षा ऑनलाइन बहुपर्यायी प्रश्नोत्तराची घेतली जाणार आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे आता बाहेरगावी असणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली असून, या परीक्षेसाठी विद्यापीठाला किमान ६ हजारांपेक्षा जास्त संगणक, इंटरनेटची जोडणी, बैठक व्यवस्था करावी लागणार आहे. यासाठी प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली पाचसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती विद्यापीठासह शहरातील महाविद्यालयांकडे संगणक, इंटरनेट सुविधा व बैठक व्यवस्थेसंबंधी पाहणी करून अहवाल सादर करणार आहे. त्यानंतरच ‘पेट-२’ कधी घ्यायची ते ठरेल. या समितीची अजून बैठक झालेली नाही, हे विशेष!
परीक्षा लांबण्याची शक्यता
‘पेट-१’ मध्ये खुल्या प्रवर्गासाठी ५० टक्के, तर मागासवर्गीयांसाठी ४५ टक्के गुण प्राप्त करणारे विद्यार्थी ‘पेट-२’साठी पात्र ठरतील, अशी अट आहे. त्यानुसार, ४५ टक्क्यांच्या पुढे गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची ही परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार २१ फेब्रुवारी रोजी होणार आहे. मात्र, आता ही परीक्षा २१ फेब्रुवारी रोजी न घेता ती पुढे लांबेल, अशी शक्यता प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांनी वर्तविली आहे.