विद्यापीठात कमी भाव असलेल्या निविदेला डावलून उधळपट्टी करण्याचा डाव फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 01:00 PM2018-04-06T13:00:09+5:302018-04-06T13:01:37+5:30

विद्यापीठ प्रशासनाने पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश सीईटी आॅनलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे.

In the university, there is a problem of discontinuation of low prices | विद्यापीठात कमी भाव असलेल्या निविदेला डावलून उधळपट्टी करण्याचा डाव फसला

विद्यापीठात कमी भाव असलेल्या निविदेला डावलून उधळपट्टी करण्याचा डाव फसला

googlenewsNext
ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ३१ मार्च रोजी घाई गडबडीत बोलावलेल्या खरेदी समितीच्या बैठकीतही सीईटीसाठी मागविलेल्या निविदेतील सर्वांत कमी दर असलेल्या कंपनीला डावलून व्ही. शाईन या कंपनीला वाजवी दरात काम देण्याचा निर्णय घेतला.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ३१ मार्च रोजी घाई गडबडीत बोलावलेल्या खरेदी समितीच्या बैठकीतही सीईटीसाठी मागविलेल्या निविदेतील सर्वांत कमी दर असलेल्या कंपनीला डावलून व्ही. शाईन या कंपनीला वाजवी दरात काम देण्याचा निर्णय घेतला. मात्र हा डाव उधळण्यात आला आहे.

विद्यापीठ प्रशासनाने पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश सीईटी आॅनलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी आॅनलाईन परीक्षेत प्रचंड गोंधळ झाला. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना हव्या त्या ठिकाणच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. ही आॅनलाईन परीक्षा पुण्याच्या व्ही. शाईन या कंपनीने घेतली होती. यावर्षीही आॅनलाईन सीईटीसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. यात एसएमबी सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड बॉम्बे, व्ही. शाईन पुणे आणि नाईन सोल्युशन नाशिक यांनी निविदा भरल्या. या निविदा उघडण्यापूर्वी विद्यापीठाच्या टेक्निकल समितीने एसएमबी ही सर्वोत्कृष्ट तांत्रिकदृष्ट्या सक्षम कंपनी असल्याची शिफारस केली. यानंतर व्ही.शाईन आणि नाईन सोल्युशनचा नंबर लागत असल्याचा अहवाल दिला.

या अहवालानंतर तिन्ही कंपनीच्या निविदा उघडण्यात आल्या. यात एसएमबीने प्रतिविद्यार्थी २२९, व्ही. शाईन १८९ आणि नाईन सोल्युशनने ७२ रुपये, असा दर दिला असल्याचे स्पष्ट झाले. यात सर्वात कमी दराची निविदा नाईन सोल्युशनची होती. मात्र सदरील कंपनीचा प्रतिनिधी दर ठरविताना उपस्थित राहिला नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे व्ही. शाईनसोबत दर कमी करण्यासंदर्भात चर्चा सुरू झाली. तेव्हा १७० रुपयांपर्यंत दर कमी करण्याची तयारी व्ही. शाईनने दाखविली. मात्र त्याच वेळी कमीत कमी २० हजार विद्यार्थ्यांचे शुल्क विद्यापीठाला द्यावे लागेल, अशी अट टाकली. मात्र ही अट जाचक असून, यात व्ही. शाईनचा टर्नओव्हर, तांत्रिक ताकद ही एसएमबीपेक्षा कमी होती. तसेच व्ही. शाईनला अनुभवही कमी होता. मात्र एक उच्च पदस्थ अधिकारी व्ही. शाईनसाठी आग्रही होता. तेव्हा  राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे यांनी एसएमबीचा विचार करत त्यांच्याशी वाटाघाटी करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर विद्यापीठ प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना मागील दोन वर्षांतील गौडबंगाल उघड होण्याच्या भीतीमुळे व्ही. शाईनला कंत्राट देण्याचा आग्रह कमी केला. यानंतर दोन दिवसांच्या चर्चेनंतर एसएमबी कंपनीलाच सीईटीचे कंत्राट देण्यात आले. या कंपनीने १६५ रुपयांमध्ये काम करण्यास तयारी दर्शविली आहे. तसेच २० हजार विद्यार्थ्यांची अटही ठेवलेली नाही. यामुळे विद्यापीठाचे लाखो रुपये वाचले आहेत.

मागील वेळी दिले होते कंत्राट
मागील वर्षी आॅनलाईन सीईटी घेण्याचे कंत्राट नियम डावलून व्ही. शाईन या कंपनीलाच दिले होते. यात कंपनीला १९० रुपये प्रतिविद्यार्थी या दराने पैसे देण्यात आले. याशिवाय कमीत कमी २० हजार विद्यार्थ्यांचे शुल्क देण्याची अटही मान्य केली होती. 
यापूर्वीही व्ही. शाईन कंपनीकडून विनानिविदा ६ कोटी रुपयांची सॉफ्टवेअरची खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रसारमाध्यमांच्या सतर्कतेमुळे तो डावही उधळला गेला होता.

पूर्णपणे पारदर्शकता आहे
पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या आॅनलाईन सीईटीसाठी विद्यापीठाच्या सर्व अधिकाऱ्यांनी तीन दिवसांच्या चर्चेनंतर कंत्राट दिले आहे. यात पूर्णपणे पारदर्शकता आहे. कंत्राट दिलेल्या कंपनीसोबत अधिकाऱ्यांनी यशस्वी बोलणी करून विद्यापीठ हिताचाच निर्णय घेतला आहे.
- डॉ. अशोक तेजनकर, प्रकुलगुरू

Web Title: In the university, there is a problem of discontinuation of low prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.