विद्यापीठाचा होणार कायापालट; १०० कोटी रुपये निधी मिळणार, 'असा' खर्च होणार निधी

By राम शिनगारे | Published: February 22, 2024 03:04 PM2024-02-22T15:04:23+5:302024-02-22T15:05:06+5:30

पीएम-उषा योजनेत मंजुरी : संशोधनासह पायाभूत सेवा-सुविधांची होणार निर्मिती

University will be transformed; 100 crores of funds will be received, the funds will be spent 'like this' | विद्यापीठाचा होणार कायापालट; १०० कोटी रुपये निधी मिळणार, 'असा' खर्च होणार निधी

विद्यापीठाचा होणार कायापालट; १०० कोटी रुपये निधी मिळणार, 'असा' खर्च होणार निधी

छत्रपती संभाजीनगर : होय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आता कायापालट होणार आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात विद्यापीठाने पायाभूत सुविधांसह संशोधनासाठी तब्बल १२० कोटी रुपयांच्या निधीची पीएम-उषा योजनेंतर्गत मागणी केली होती. त्यात १०० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. त्याशिवाय विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या घनसावंगी येथील मॉडेल कॉलेजलाही ४ कोटी रुपये मिळाले आहेत.

केंद्र शासनाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शैक्षणिक संस्थांच्या विकासासाठी केंद्रीय शिक्षण विभागांतर्गत प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम-उषा) राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यांच्या उच्च शिक्षण विभागामार्फत विद्यापीठ, महाविद्यालयांकडून पायाभूत सुविधा आणि संशोधनासाठी प्रस्ताव मागविले होते. निधीसाठीचा प्रस्ताव बनविण्यासाठी तत्कालीन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दहा सदस्यांची समिती नेमली होती. समितीने विद्यापीठातील विभागप्रमुख व उपकेंद्रातील ४८ विभागांकडून प्रस्ताव मागविले होते. यातून डॉ. येवलेंच्या नेतृत्वात रुसा सेल व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ. गुलाब खेडकर यांनी १२० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला. याचे सादरीकरण ३१ ऑगस्ट २०२३ रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत राज्य शासनाकडे केले. शासनाच्या मंजुरीनंतर केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील उच्च शिक्षण विभागांतर्गत 'प्रोजेक्ट ॲप्रूव्हल बोर्ड'ची (पीएबी) मागील महिन्यात बैठक झाली. त्या बैठकीत विद्यापीठाला १०० कोटी व मॉडेल कॉलेजला ४ कोटींचा निधी मंजूर केला.

...असा खर्च होणार निधी
विद्यापीठाला मिळणाऱ्या १०० कोटी रुपयांमध्ये ४० कोटी रुपये पायाभूत सुविधा व बांधकामासाठी असतील. त्याशिवाय वैज्ञानिक उपकरणांच्या खरेदीसाठी ३० कोटी, रिनोव्हेशन ॲण्ड अपग्रेडेशनसाठी २० कोटी आणि विविध प्रशिक्षणासाठी १० कोटी रुपये खर्च होतील. पहिल्या टप्प्यात विद्यापीठास ६५, दुसऱ्यात ३० आणि तिसऱ्यात ५ कोटी मिळतील.

कुलगुरूंची बैठक
विद्यमान कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यामुळे रविवारी सुटीच्या दिवशी प्रस्तावाचा आढावा घेतला. बैठकीला प्रकुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे, रुसा सेल व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ. गुलाब खेडकर व प्रभारी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांची उपस्थिती होती.

टीमवर्कचे यश
विद्यापीठातील विभागप्रमुखांसह समितीने अथक परिश्रम घेत तयार केलेल्या प्रस्तावाचे मुंबईत दोन वेळा, दिल्लीत एकदा सादरीकरण झाले. सर्वांनी केलेल्या टीमवर्कमुळेच विद्यापीठास १०० व मॉडेल कॉलेजला ४ कोटी रुपये मंजूर झाले. माझ्याकडे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचाही पदभार होता. त्या विद्यापीठाला २० आणि मॉडेल कॉलेजला ४ कोटी, असा एकूण २४ कोटींचा निधी मंजूर झाला. माझ्या नेतृत्वात सादर झालेल्या प्रस्तावांना १२८ कोटी रुपये मंजूर झाले, याचा विशेष आनंद आहे.
-डॉ. प्रमोद येवले, तत्कालीन कुलगुरू

Web Title: University will be transformed; 100 crores of funds will be received, the funds will be spent 'like this'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.