विद्यापीठाला आणखी दोन ‘इन्क्युबेशन’ केंद्र मिळणार;केंद्र आणि राज्य सरकारकडे प्रस्ताव दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 11:35 AM2018-09-08T11:35:10+5:302018-09-08T11:37:06+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात केंद्रीय उच्चतर अभियान (रुसा) आणि राज्य उद्योग मंत्रालयातर्फे प्रत्येकी एक ‘अटल इन्क्युबेशन’ केंद्र मिळणार आहे
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात केंद्रीय उच्चतर अभियान (रुसा) आणि राज्य उद्योग मंत्रालयातर्फे प्रत्येकी एक ‘अटल इन्क्युबेशन’ केंद्र मिळणार असून, यासाठीचा प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठात बजाज कंपनीच्या सीएसआर निधीतून एक इन्क्युबेशन केंद्र उभारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटनही नुकतेच झाले असून, त्यातून कामकाजाला सुरुवातही झाली. या इन्क्युबेशन केंद्रातून उद्योगांना लागणारे संशोधन आणि मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी मदत होणार आहे. याचवेळी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विद्यापीठांमधून उद्योजक निर्माण होण्यासाठी रुसाअंतर्गत ‘अटल इन्क्युबेशन’ निर्माण करण्याची योजना सुरू केली आहे. हे इन्क्युबेशन केंद्र तब्बल १० कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणार आहे.
यासाठी विद्यापीठाने तयार केलेला प्रस्ताव रुसा केंद्राने मान्य केला आहे. यामुळे येत्या काही दिवसांतच या केंद्राच्या उभारणीला सुरुवात होईल. तसेच राज्याच्या उद्योग मंत्रालयानेही उद्योगधंदे असलेल्या ठिकाणच्या विद्यापीठांमध्ये नवउद्योजकांची निर्मिती व्हावी, उद्योगांना लागणारे संशोधन आणि मनुष्यबळ अल्पदरात उपलब्ध होण्यासाठी विद्यापीठांना इन्क्युबेशन केंद्र देण्याचा निर्णय घेतला आहे. हे केंद्र ८ कोटी रुपयांच्या निधीतून उभारले जाणार आहे. यासाठीचा प्रस्तावही दाखल करण्यात आला आहे. मुंबई, पुण्यानंतर औरंगाबादेत मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा प्रस्ताव राज्य स्वीकारणार असल्याचे प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
मराठवाड्याला फायदा होईल
विद्यापीठात एक इन्क्युबेशन केंद्र सुरू केले आहे. आता त्यात आणखी दोनची भर पडणार आहे. यातून मराठवाड्यासारखा अविकसित भागात उद्योजक निर्माण होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होईल. यासाठी विद्यापीठ सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.
-डॉ. बी.ए. चोपडे, कुलगुरू