विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; तरुणाईच्या जल्लोषाने परिसर गजबजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 03:47 PM2018-09-26T15:47:58+5:302018-09-26T15:54:35+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात युवा महोत्सव-२०१८ ला आज सकाळी जल्लोषात सुरुवात झाली.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात युवा महोत्सव-२०१८ ला आज सकाळी जल्लोषात सुरुवात झाली. प्रवेशद्वार ते मुख्य रंगमंचापर्यंत शोभायात्रेने सुरुवात झालेल्या महोत्सवाचे उद्घाटन अभिनेते सुबोध भावे, माजी विद्यार्थी व अभिनेते उमेश जगताप यांच्या झाले.
उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते. व्यासपीठावर प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, नलिनी चोपडे, परीक्षा संचालक डॉ. जयश्री सुर्यवंशी, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. मुस्तजिब खान, संयोजन समिती सदस्य डॉ. दासू वैद्य, प्रा. संभाजी भोसले, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. जयंत शेवतेकर, डॉ. संजय नवले, डॉ. संजय पाटील, डॉ. सुधाकर शेंडगे यांच्यासह व्यवस्थापन परिषद, अधिसभा आणि अधिष्ठातांची उपस्थित होती.
युवा महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी प्रवेशद्वार ते मुख्य रंगमंचापर्यंत शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत विविध महाविद्यालयांनी सहभागी होत सामाजिक संदेश दिला. उद्घाटनानंतर सुबोध भावे व उमेश जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केला. प्रस्ताविक आणि आभार संचालक डॉ. मुस्तजिब खान यांनी मानले. कार्यक्रमाला कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
अभाविप आणि आंबेडकरी संघटनांमध्ये कुलगुरू दालनात झालेल्या राड्यामुळे आंबेडकरी संघटनांनी युवा महोत्सव उधळून लावण्याचा इशारा दिला होता. यामुळे उद्घाटन स्थळी बंदुकधारी फौजफाटा मोठ्या प्रमाणात तैनात केला होता. गोंधळ घालणारांना पायबंद घालण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज होती. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याचवेळी आंबेडकरी विद्यार्थीं संघटनांनी पत्रक काढून विद्यार्थी हितासाठी युवा महोत्सव उधळून लावण्याचा निर्णय मागे घेतल्याचे कळविले आहे.