विद्यापीठाची आजपासून ५ वर्षांतील सर्वांत मोठी परीक्षा; मूल्यांकनासाठी नॅकची ‘पीअर टीम’ दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 11:46 AM2024-10-22T11:46:00+5:302024-10-22T11:47:00+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पाच वर्षांपूर्वी झालेल्या नॅक मूल्यांकनात ‘अ’ श्रेणी मिळविली होती.
छत्रपती संभाजीनगर : पाच वर्षांनंतर संपूर्ण विद्यापीठाचे मूल्यांकन करणारी बंगळुरू येथील ‘पीअर टीम’ दाखल झाली आहे. आज, मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून गुरुवारपर्यंत विविध विभागांना भेट देणार आहेत. तत्पूर्वी विद्यापीठ प्रशासनाने सोमवारी विभागप्रमुखांची बैठक घेत तयारीची उजळणी केली. विद्यापीठाची महत्त्वाच्या २१ विभागांसह विस्तार सेवांवर भिस्त असल्याचे सांगण्यात येते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पाच वर्षांपूर्वी झालेल्या नॅक मूल्यांकनात ‘अ’ श्रेणी मिळविली होती. आता पुन्हा नॅक मूल्यांकनासाठी विद्यापीठ प्रशासनाने तयारी केली. विद्यापीठाचा स्वयंमूल्यमापन अहवाल (एसएसआर) मे महिन्यात अंतिम करून तो राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेकडे पाठविला होता. त्यानंतर ‘नॅक पीअर टीम’ विद्यापीठात दाखल होत आहे. मंगळवार ते गुरुवारपर्यंत सातजणांची टीम विविध विभागांना भेट देत स्वयंमूल्यमापन अहवालानुसार तपासणी करणार आहे.
या सात निकषांवर भर
नॅक मूल्यांकनात सात निकषांवर भर देण्यात येतो. यामध्ये अभ्यासक्रमाचे पैलू, अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन, संशोधन, नवकल्पना आणि विस्तार, पायाभूत सुविधा आणि शिकण्याची संसाधने, विद्यार्थ्यांची प्रगती, शासन, नेतृत्व आणि व्यवस्थापन, संस्थात्मक मूल्ये आणि सर्वोत्तम पद्धती, आदींचा समावेश आहे. ‘नॅक’च्या निकषांचा विचार करीत विद्यापीठाने काही विभागांवर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे सांगण्यात येते. ज्यामध्ये २१ विभागांचा समावेश आहे. यासह कमवा व शिका योजना, ग्रंथालय अशा विस्तार सेवांवरही भर असणार आहे.
मूल्यांकन समितीमध्ये सातजणांचा समावेश
मूल्यांकनासाठी प्रा. ए. एन. राय यांच्या अध्यक्षतेखालील ‘पिअर टिम’मध्ये प्रा. विमला एम या सदस्य समन्वयक आहेत. तसेच प्रा. विशाल गोयल, प्रा. रोव्हरू नागराज, प्रा. ग्यानेंद्र कुमार राऊत, प्रा. साबियासी सारखेल व प्रा. के. एस. चंद्रशेखर यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. २२ ते २४ ऑक्टोबर दरम्यान समिती विभागांना भेट देणार आहे. ही समिती सकाळी ९ ते सायंकाळी नियोजित काम संपेपर्यंत पाहणी करेल. तसेच विद्यार्थी, संशोधक, माजी विद्यार्थी, पालक, विभागप्रमुख, अधिष्ठाता, कर्मचारी, व्यवस्थापन परिषद सदस्य, आदींशी संवाद साधणार आहे.