विद्यापीठाची ‘नॅक’ मूल्यांकनाची अग्निपरीक्षा सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 08:43 PM2019-03-25T20:43:13+5:302019-03-25T20:45:14+5:30
माजी कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या कार्यकाळात २०१२ साली विद्यापीठाचे मूल्यांकन झाले होते.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद (नॅक) कडून २५ ते २७ मार्चदरम्यान मूल्यांकन होणार आहे. यासाठी विद्यापीठ प्रशासन सज्ज झाले असून, तीन दिवस प्रशासनाची अग्निपरीक्षा असणार आहे.
‘नॅक’कडून प्रत्येकी पाच वर्षाला देशभरातील महाविद्यालये, विद्यापीठांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन केले जाते. गुणवत्तेची तपासणी केल्यानंतर नॅककडून दर्जा बहाल केला जातो. या दर्जाच्या आधारेच केंद्र शासन, विद्यापीठ अनुदान आयोग, राज्य शासनासह इतर संस्थांकडून विद्यापीठाच्या विकासासाठी निधी देण्यात येतो. माजी कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या कार्यकाळात २०१२ साली विद्यापीठाचे मूल्यांकन झाले होते. यात विद्यापीठाने ‘ब’ दर्जावरून ‘अ’ दर्जापर्यंत झेप घेतली होती. डॉ. पांढरीपांडे यांच्या काळात झालेले मूल्यांकन हे द्वितीय होते.
विद्यमान कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कार्यकाळात २५ ते २७ मार्चदरम्यान होणारे मूल्यांकन हे ‘थर्ड सायकल’चे असल्यामुळे अतिशय कठीण आहे. यातच ‘नॅक’च्या बदललेल्या नियमानुसार हे मूल्यांकन होणार आहे. सुधारित नियमानुसार ७५ टक्के मूल्यांकन विद्यापीठ प्रशासनाने त्यांच्याकडे असलेला डाटा ‘नॅक’च्या कार्यालयाकडे अपलोड करून आणि विद्यार्थ्यांच्या फिडबॅकच्या आधारावरच झाले आहे. उर्वरित २५ टक्के मूल्यांकन सहा सदस्यीय समिती प्रत्यक्ष पाहणीद्वारे करणार आहे.
मूल्यांकन करण्यासाठी देशभरातील विविध विद्यापीठांमधून सहा सदस्य रविवारी सायंकाळी शहरात दाखल झाले आहेत. सोमवारी सकाळी ९ वाजता हे सदस्य दाखल होतील. त्याठिकाणी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे हे साडेनऊ वाजता नॅक समितीसमोर विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा, भविष्यातील विविध योजनांचे सादरीकरण करणार असल्याची माहिती प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी दिली.
नॅकच्या पार्श्वभूमीवर रविवारीही विद्यापीठ सुरू होते. विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची रविवारी दुपारी १ वाजता कुलगुरू, प्रकुलगुरूंनी बैठक घेतली. त्यानंतर विद्यापीठाच्या आयक्वॅक समितीचे सदस्य, प्रकुलगुरूंनी विविध विभागांना भेटी देऊन पाहणी केली. तीन दिवसांत समिती विभाग, ग्रंथालय, उस्मानाबाद येथील उपकेंद्रातील प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचेही डॉ. तेजनकर यांनी सांगितले.
सगळीकडे स्वच्छता, बॅनर हटविले
विद्यापीठात सगळीकडे रंगरंगोटी, स्वच्छता केली आहे. विविध ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर हटविण्यात आले आहेत. नॅक समितीच्या स्वागतासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. विविध विभागात केले जाणारे सादरीकरण, माहिती आदींचा आढावा रविवारी घेण्यात आला. योग्य त्या ठिकाणी बदल, सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ‘नॅक’च्या परीक्षेत प्रशासन १०० टक्के उत्तीर्ण होणार असल्याचेही डॉ. तेजनकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
नक्कीच चांगले गुण मिळतील
विद्यापीठाने मागील वर्षभरापासून ‘नॅक’च्या मूल्यांकनाची तयारी सुरू केली होती. ही तयारी पूर्ण झाली आहे. पायाभूत सुविधांसह शैक्षणिक अहवाल, विद्यार्थ्यांची प्रगतिपुस्तके तयार झाली आहेत. प्रत्येक विभाग स्वतंत्रपणे समितीसमोर विकास मांडील. त्यात नक्कीच चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होईल.
-डॉ. अशोक तेजनकर,प्रकुलगुरू