विद्यापीठाच्या रौप्यमहोत्सवी नामविस्तार दिनाचा पाहुणा ठरेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 05:09 PM2019-01-12T17:09:37+5:302019-01-12T17:10:25+5:30

ऐतिहासिक लढ्यानंतर झालेल्या नामविस्ताराला १४ जानेवारी रोजी २५ वर्षे पूर्ण होत आहेत.

The university's Namvistar Day silver jubilee celebration's chief guest still not decided | विद्यापीठाच्या रौप्यमहोत्सवी नामविस्तार दिनाचा पाहुणा ठरेना

विद्यापीठाच्या रौप्यमहोत्सवी नामविस्तार दिनाचा पाहुणा ठरेना

googlenewsNext
ठळक मुद्देऐनवेळी आमंत्रण दिल्यामुळे शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांचा नकार

औरंगाबाद : ऐतिहासिक लढ्यानंतर झालेल्या नामविस्ताराला १४ जानेवारी रोजी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. हा रौप्यमहोत्सवी सोहळा भव्य-दिव्य करण्यासाठी विविध पक्ष, संघटना, संस्था कामाला लागल्या आहेत. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाला या सोहळ्यासाठी अद्यापही पाहुणा मिळाला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

नामविस्तार दिनाचा रौप्यमहोत्सव साजरा करण्यासाठी अधिसभेने ५० लाख रुपये खर्चाची तरतूद केली आहे. सर्व सदस्यांनी नामविस्तार दिनाचे रौप्यमहोत्सवी वर्ष ऐतिहासिक पद्धतीने साजरे करण्याच्या सूचना केल्या. मात्र, विद्यापीठ प्रशासनाची याबाबतीत उदासीनता दिसून येत आहे. महिनाभरापूर्वी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी नामविस्ताराचा निर्णय घेणारे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना बोलावणार असल्याचे सांगितले. मात्र त्याच बैठकीत विद्यमान मुख्यमंत्र्यांनाही बोलावण्याची मागणी झाली.

यानंतर हा विषय थंड्या बस्त्यात गेला. काही दिवसांपूर्वी कुलगुरूंनी व्यवस्थापन परिषदेचे डॉ. नरेंद्र काळे यांच्या उपस्थितीत २७ डिसेंबर रोजी शरद पवार यांची भेट घेऊन कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. मात्र १३ जानेवारी रोजी पवार यांचा बेळगाव येथे सायंकाळी नियोजित कार्यक्रम आहे. १४ जानेवारी रोजी मुंबईत नियोजित कार्यक्रम आहे. नियोजित कार्यक्रम करून औरंगाबादेतील कार्यक्रमास येण्यासाठी प्रवास करणे प्रकृती अस्वस्थ्यामुळे शक्य होत नसल्यामुळे त्यांनी तशा पद्धतीचे पत्र विद्यापीठ प्रशासनाला पाठविले.

तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे औरंगाबादेतील विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी ३ जानेवारी रोजी आले असता कुलगुरू, प्रकुलगुरूंनी त्यांची भेट घेऊन नामविस्ताराला येण्याचे निमंत्रण दिले. मुख्यमंत्र्यांचेही नियोजित कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी नकार कळविल्याचे सूत्रांनी सांगितले. नामविस्तार दिनाला पाहुणा कोण असावा यासाठी कुलगुरू, विद्यार्थी विकास संचालक डॉ. मुस्तजिब खान आणि व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सायंकाळी बैठक झाली. त्यातही कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब झाले नसल्याचे समजते. याविषयी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांना विचारले असता, पाहुणे ठरविण्याच्या प्रक्रियेत सहभागी नसल्याचे त्यांनी सांगितले. कुलगुरू व विद्यार्थी विकास संचालकांशी संपर्क होऊ शकला नाही.

आज काही नावांवर चर्चा
कुलगुरूंच्या उपस्थित झालेल्या बैठकीत विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री राजकुमार बडोले आणि आंबेडकरी विचारवंत अर्जुन डांगळे यांच्या नावावर चर्चा करण्यात आली. यात अर्जुन डांगळे यांचे नाव शनिवारी सकाळी अंतिम होण्याची शक्यता आहे.

Web Title: The university's Namvistar Day silver jubilee celebration's chief guest still not decided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.