विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षा नियोजित वेळीच होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 07:19 PM2018-10-25T19:19:26+5:302018-10-25T19:22:00+5:30
आजच्या बैठकीत परीक्षा नियोजित वेळीच घेण्यावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. जयश्री सुर्यवंशी यांनी दिली.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या नियोजित परीक्षा दिवाळीनंतर घेण्याची मागणी विद्यार्थी संघटनांनी केली होती. यामुळे परीक्षा दिवाळीपूर्वी होणारी की नंतर याविषयी मागील तीन दिवसांपासून संभ्रम निर्माण झाला होता. यावर निर्णय घेण्यासाठी आज परीक्षा मंडळाची बैठक घेण्यात आली. यात परीक्षा नियोजित वेळीच घेण्यावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. जयश्री सुर्यवंशी यांनी दिली.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने एम.ए., एम.कॉम., एम.एसस्सी., एमबीए आदी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा ३१ आक्टोंबरपासून सुरू करण्याचे वेळापत्रक जाहीर केले होते. या परीक्षा ४ नोव्हेंबरपर्यंत घेण्याचे नियोजन होते. त्यानंतर ५ ते ११ नोव्हेंबरपर्यंत दिवाळीसाठी सुट्या देण्यात आल्या होत्या. मात्र सम्यक विद्यार्थी आंदोलनचे डॉ. कुणाल खरात यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना सोबत घेत दिवाळीनंतर परीक्षा घेण्याची मागणी केली होती. मात्र कुलगुरू दौ-यावर असल्यामुळे त्यावर निर्णय होत नव्हता.
कुलगुरू गुरूवारी (दि.२५) विद्यापीठात परल्यानंतर तात्काळ परीक्षा मंडळाची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे, प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, परीक्षा संचालक डॉ. जयश्री सुर्यवंशी, सदस्य डॉ. गोविंद काळे यांच्यासह चारही अधिष्ठाता उपस्थित होते. या बैठकीत पदव्युत्तरच्या परीक्षा दिवाळीनंतर घेतल्यास पुढील सत्र सुरू करण्यास उशिर होत आहे. यातच अभियांत्रिकीच्या परीक्षाही पुढे ढकलाव्या लागण्याची शक्यता असल्यामुळे नियोजित वेळापत्रकानुसारच परीक्षा घेण्याचा निर्णय बहुमताने घेतल्याची माहिती डॉ. सुर्यवंशी यांनी दिली. दरम्यान सम्यक विद्यार्थी आंदोलनचे डॉ. कुणाल खरात यांनी प्रकुलगुरूंची भेट घेत दिवाळीनंतर परीक्षा घेण्याची विनंती केली. मात्र तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्यामुळे प्रकुलगुरूंनी विद्यार्थ्यांनी समजावून सांगितले. यानंतर डॉ. खरात यांच्यासह विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.
३६ हजार विद्यार्थी देणार परीक्षा
पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा ३१ आक्टोंबर या नियोजित वेळेनुसारच सुरू होणार आहेत. या परीक्षेला ३६ हजार विद्यार्थी ६१ केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी भरारी पथकाऐवजी बैठ पथक देण्याचा विचार सुरू असल्याचेही डॉ. सुर्यवंशी यांनी स्पष्ट केले.