विनापरवाना दारू पिने पडले महागात; २२ मद्यपी, ३ ढाबा मालकांना ठोठावला ८८ हजारांचा दंड
By राम शिनगारे | Published: September 24, 2022 04:04 PM2022-09-24T16:04:50+5:302022-09-24T16:05:30+5:30
ढाबा मालक विनापरवाना ग्राहकांना मद्यसेवनासाठी जागा उपलब्ध करुन देत असल्यामुळे गुन्हा दाखल
औरंगाबाद : राज्य उत्पादन शुल्क विभागाने ढाब्यावर अवैधरित्या दारु पिणाऱ्या २२ मदयपींसह ३ ढाबा मालकांवर छापा मारला. त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवित औरंगाबाद, फुलंब्री येथील न्यायालयात हजर केले असता, त्यांना तब्बल ८८ हजारांचा दंड ठोठावला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक विजय राेकडे यांच्या पथकाने जालना रोडवरील हॉटेल ग्रीन चिल्ली येथे छापा मारीत अवैध दारु पिणाऱ्यांना पकडले होते. या छाप्यात अवैधरित्या दारु पिणारे १८ ग्राहक आणि ढाबा मालक रवी रघुनाथ नवपुते यांच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदवला होता. ही कारवाई २१ सप्टेंबरच्या रात्री केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी संबंधित आरोपींच्या विरोधात जिल्हा न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, ढाबा मालक रवी नवपुते यास २५ हजार रुपये आणि मद्यसेवन करणाऱ्या १८ ग्राहकांनी प्रत्येकी ५०० रुपये असा एकुण ३४ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
छापा मारण्यापासून दोषारोपत्र दाखल करुन आरोपींना शिक्षा होईपर्यंत सर्व प्रक्रिया १६ तासात पार पडल्याची माहिती निरीक्षक रोकडे यांनी दिली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या क विभागाचे निरीक्षक नारायण डहाणे यांच्या पथकाने सावंगी बायपास रोडवरील हॉटेल शिवकन्या श्रावणी येथे २१ सप्टेंबरच्या रात्री छापा मारला. तेव्हा त्याठिकाणी ढाबा मालक दत्ता सोनवणे, शुभम बळी यांच्यासह चार मद्यपिंना पकडण्यात आले होते. ढाबा मालक विनापरवाना ग्राहकांना मद्यसेवनासाठी जागा उपलब्ध करुन देत असल्यामुळे सहा जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
या आरोपींच्या विरोधात फुलंब्री प्रथमवर्ग न्यायालयात २३ सप्टेंबर रोजी दोषारोपपत्र सादर केले. तसेच न्यायालयात आरोपींनाही हजर करण्यात आले. यात ढाबा मालक दत्ता सोनवणे, शुभम बळी यांना प्रत्येकी २५ हजार आणि चार मद्यपींना प्रत्येकी १ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. ही कामगिरी अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक विजय रोकडे, नारायण डहाके, आर.के.गुरव, जी.बी. इंगळे,बी.आर. वाघमोडे, सहाय्यम दुय्यम निरीक्षक ए.जी.शेंदरकर,प्रविण पुरी, जवान अमित नवगिरे, अमोल अन्नदाते, किशोर सुंदर्डे यांच्या पथकाने केली.