‘अनलॉक’मुळे लोकप्रतिनिधींच्या बैठकीला ‘लॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:05 AM2021-06-09T04:05:54+5:302021-06-09T04:05:54+5:30
औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये होणाऱ्या संवाद बैठकांना शहरात सोमवारपासून ‘अनलॉक’ लागू ...
औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये होणाऱ्या संवाद बैठकांना शहरात सोमवारपासून ‘अनलॉक’ लागू झाल्याने ‘लॉक’ लागणार आहे.
आता दर शुक्रवारी ऑक्सिजन बेड्सवरील रुग्णसंख्या आणि कोरोना पॉझिटिव्हिटी दराचा प्रशासकीय आढावा यापुढे घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या लॉकडाऊन नियमात शहर पहिल्या स्तरात आल्यामुळे धार्मिक स्थळे आणि शैक्षणिक संस्था वगळता शहरात सर्व क्षेत्रांवर असलेले निर्बंध शिथिल करून सर्व नियमितपणे खुले करण्यात आले आहे, तर ग्रामीण भागात सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत निर्बंध शिथील आहेत. जिल्ह्याचा कोरोना रुग्ण पॉझिटिव्हिटी दर जास्त असल्यामुळे ग्रामीण भागात निर्बंध कडक करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकांत कोरोना उपाययोजना, व्हेंटिलेटरचा वापर, खाटांची उपलब्धता, म्युकरमायकोसिसच्या औषधांची गरज आणि पुरवठा याबाबत चर्चा होऊन निर्णय होत आले.
आरटीपीसीआर करून घ्यावीच लागेल
आठ दिवसांत चांगले परिणाम दिसले नाही तर पुन्हा निर्णय बदलावे लागतील. आता व्यापाऱ्यांनी आठवडाभरात कर्मचाऱ्यांच्या टेस्टिंग करून घेतल्या पाहिजेत. आरटीपीसीआरबाबत प्रशासन आग्रही आहे. लॅबची क्षमता वाढविण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार सर्व काही निर्णय घेतले आहेत. ग्रामीण भागात लावलेल्या निर्बंधांचे उल्लंघन झाले तर कडक कारवाई करण्यात येईल. ग्रामीण भाग मोठा असल्यामुळे सध्या पॉझिटिव्हिटी रेट थोडा जास्त आहे. परंतु येणाऱ्या काळात आणखी जास्त काळजी घेण्यात येईल. दोन तासांचा वेळ शिल्लक दिला आहे. तरीही नागरिकांनी काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.