सुविधांबाबत हलगर्जीपणा

By Admin | Published: June 29, 2014 12:50 AM2014-06-29T00:50:31+5:302014-06-29T01:06:09+5:30

औरंगाबाद : शहरात चार दिवसांपूर्वी खासगी हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात (आयसीयू) शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित झाला.

Unluckily about the facilities | सुविधांबाबत हलगर्जीपणा

सुविधांबाबत हलगर्जीपणा

googlenewsNext

औरंगाबाद : शहरात चार दिवसांपूर्वी खासगी हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात (आयसीयू) शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे दोन रुग्णांना इतरत्र हलवावे लागले. या गोंधळामुळे रुग्ण दगावल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे येथील सरकारी तसेच खासगी हॉस्पिटल्समधील आयसीयूमध्ये असणाऱ्या यंत्रणेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आयसीयूमधील यंत्रणांची महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून पाहणी केली जात नसल्याचेही यानिमित्त समोर आले आहे. आयसीयूमधील विजेची पर्यायी व्यवस्था, व्हेंटिलेटर, एसी आदींबाबतचा निष्काळजीपणा रुग्णांचे जीवित धोक्यात आणू शकतो.
हृदयाशी संबंधित विकारांवर सुलभ उपचारासाठी तसेच अत्यवस्थ आणि श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या रुग्णांसाठी कृत्रिम श्वासोच्छ्वास मिळावा म्हणून आयसीयू विभाग महत्त्वाचा ठरतो. वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याचा कोणताही परिणाम हॉस्पिटलमधील आयसीयू विभागावर होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी वीजपुरवठा असणे आवश्यक आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास आयसीयूमधील सुविधा बंद पडून धोका होण्याची भीती नाकारता येत नाही. त्यामुळे आयसीयूसाठी स्वतंत्र जनरेटरची व्यवस्था आवश्यक असते. आयसीयूची सुविधा असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये विजेची पर्यायी व्यवस्था म्हणून जनरेटरची व्यवस्था केली जाते. परंतु शॉर्टसर्किटमुळे झालेल्या घटनेनंतर आयसीयूमधील विजेची पर्यायी व्यवस्था, व्हेंटिलेटर आदी सुविधांबाबत हॉस्पिटलकडून कितपत काळजी घेतली जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विविध सुविधा हव्यात
आयसीयूमध्ये व्हेंटिलेटर, मॉनिटर, ब्लड गॅस मशीन, पॅथॉलॉजी बॅकअप, एसी, ट्रेन नर्सिंग स्टाफ, हाताने पंपिंग करून रुग्णाला आॅक्सिजन देणारी यंत्रणा, जनरेटर, जंतू संसर्ग होऊ न देणारी यंत्रणा आदी सुविधांची आवश्यकता असते.
५० हॉस्पिटलमध्ये आयसीयू सुविधा
शहरातील जवळपास ५० हॉस्पिटलमध्ये आयसीयूची सुविधा आहे. मोठ्या हॉस्पिटलमध्ये आयसीयू स्डँडर्ड नॉर्मनुसार आहे; परंतु काही हॉस्पिटलमधील आयसीयू तसे नसल्याचे मत मनपा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
सुविधा महत्त्वाच्या
आयसीयूमध्ये आॅक्सिजनचा पुरवठा, एसी, पोल्युशन फ्री वातावरण आदी महत्त्वाचे ठरते. नवीन व्हेंटिलेटर वीजपुरवठा खंडित झाल्यावरही बंद पडत नसल्याचे डॉ. शेख मुर्तुजा यांनी सांगितले.
आयसीयूंची लवकरच तपासणी
आयसीयूचे स्टँडर्ड नॉर्म आहेत. या नॉर्मनुसार आयसीयू असायला पाहिजेत. परंतु शहरातील अनेक आयसीयू या नॉर्मनुसार नाहीत. काही आयसीयूबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच शहरातील आयसीयूंची तपासणी केली जाणार आहे, असे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी म्हटले.

Web Title: Unluckily about the facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.