१० लाखांसाठी मॅनेजरकडून पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार; तक्रार दाखल होताच झाला फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 03:15 PM2022-07-20T15:15:49+5:302022-07-20T15:16:44+5:30
लग्नाच्या १७ वर्षानंतर पतीची कुर्रता वाढली
औरंगाबाद : वाळूज एमआयडीसी भागात असलेल्या एका नामांकित कंपनीच्या व्यवस्थापकाने पत्नीवरच सतत अनैसर्गिक अत्याचार करीत छळ केला. तसेच व्यवसाय टाकण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये घेऊन येण्यासाठी मानसिक छळ, मारहाण केली. या प्रकरणी पत्नीने छावणी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अत्याचारासह छळाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
जून २००४ मध्ये लग्न झालेल्या भाग्यश्री (नाव बदलले) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा पती गिरीश (नाव बदलले) हे वाळूज एमआयडीसीतील एका नामांकित कंपनीत मॅनेजर आहेत. दोघांना एक मुलगा आहे. लग्नानंतर काही दिवस दिल्लीमध्ये नोकरी केल्यानंतर गिरीशची औरंगाबादेत २००८ मध्ये बदली झाली. तेव्हापासून तिघेजण सोबत राहत असत. मागील काही दिवसांपासून गिरीशला व्यवसाय सुरू करायचा असल्यामुळे तो पत्नी भाग्यश्रीला माहेरहून दहा लाख रुपये घेऊन येण्यासाठी छळ करीत होता.
या त्रासाला कंटाळून भाग्यश्रीने १६ जुलै रोजी माहेर गाठले.
माहेरी दोघांच्या कुटुंबातील नातेवाईकांची १७ जुलै रोजी बैठक झाली. या बैठकीत गिरीशने यापुढे छळ करणार नाही, असा शब्द दिला. त्यामुळे भाग्यश्री पुन्हा त्याच दिवशी औरंगाबादत आल्या. त्याच रात्री ११ वाजेच्या सुमारास पुन्हा गिरीशने पैशासाठी वाद सुरू केले. या वादात भाग्यश्री यांना बेदम मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्यावर खोलीमध्ये ओढत नेऊन गिरीशने अनैसर्गिक अत्याचार केले. यापूर्वीही त्याने अनेकवेळा इच्छेविरुद्ध अनैसर्गिक अत्याचार केले होते. त्यामुळे पतीसोबत राहण्यास भीती वाटत असल्यामुळे त्यांनी पोलिसात फोन केला. तेव्हा पतीने घरातील दोन लाख रुपये आणि सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी अधिक तपास सहायक निरीक्षक मनिषा हिवराळे करीत आहेत.
१७ वर्षांनंतर वाद
भाग्यश्री व गिरीश यांच्या लग्नाला १७ वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यांना एक मुलगाही आहे. एवढ्या कालावधीनंतर दोघांमध्ये वाद सुरु झाले. तसेच पतीच्या विरोधात अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.