गॅस किट बसविण्याचा अनधिकृत धंदा वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:04 AM2021-09-24T04:04:12+5:302021-09-24T04:04:12+5:30
औरंगाबाद : पेट्रोलपेक्षा सीएनजी परवडत असल्याने पेट्रोल कारला सीएनजी गॅस किट बसवून घेण्याकडे कारचालकांचा कल वाढला आहे. याचा गैरफायदा ...
औरंगाबाद : पेट्रोलपेक्षा सीएनजी परवडत असल्याने पेट्रोल कारला सीएनजी गॅस किट बसवून घेण्याकडे कारचालकांचा कल वाढला आहे. याचा गैरफायदा घेत शहरात गॅस किट बसवून देणारी अनधिकृत केंद्र अनेक ठिकाणी सुरु झाली आहेत. पण, राज्य परिवहन विभागाने (आरटीओ) फक्त ४ सीएनजी रिट्रोफिटर सेंटरलाच परवानगी दिल्याचे समोर आले आहे.
शहरात गुरुवारी पेट्रोल १०८.६० रुपये प्रतिलीटर होते, तर सीएनजीचा दर ७१.३५ रुपये प्रतिकिलो ग्रॅम होता. पेट्रोलपेक्षा सीएनजी ३७.२५ रुपयांनी स्वस्त आहे. शहरात ८ सीएनजी पंपांना मंजुरी मिळाली असून, त्यापैकी ४ सीएनजी पंप सुरु झाले आहेत. सीएनजी पाईपलाईन कार्यान्वित होताच शहरातील ४०पैकी बहुतांश पेट्रोल पंपावर सीएनजी उपलब्ध होणार आहे. यामुळे पेट्रोल कारला आता सीएनजी किट बसवून घेण्याकडे ओढा वाढला आहे.
सध्या नवीन सीएनजी कारसाठी ९ महिन्यापर्यंत प्रतीक्षा असल्याने ग्राहक आपल्या जुन्या पेट्रोल कारलाच सीएनजी किट बसवून घेत आहेत. परिणामी, शहरात सीएनजी गॅस किट केंद्रांची संख्या वाढली आहे. शहर व आसपासच्या परिसरात १० ते १५ केंद्र सुरु झाली आहेत. मात्र, यातील ४ सीएनजी रिट्रोफिटर केंद्रांनाच मंजुरी दिली असल्याची माहिती आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली.
चौकट
स्वस्तच्या नादात होऊ शकतो धोका
सीएनजी गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे सीएनजी गॅस किटचा भाव वर्षभरात ७ हजार रुपयांनी वाढला आहे. ३५ हजारांपासून सीएनजी किट मिळत आहे. यात
सिक्वेंशियल सीएनजी किट हे आधुनिक किट ५० ते ७० हजार रुपयांच्या दरम्यान आहे. स्वस्तातील लोकल सीएनजी किट वापरणे धोकादायक ठरु शकते. त्यात शॉर्टसर्कीट होणे, आग लागण्याचे प्रकार होऊ शकतात.
चौकट
तज्ज्ञांनी सांगितले की,
१) अधिकृत सीएनजी रिट्रोफिटर केंद्रांतून किट बसवा.
२) स्वस्तातील सीएनजी किट बसवू नका. त्यात निकृष्ट मटेरियल वापरतात.
३) कारची सर्व्हिसिंग करतात तशीच सीएनजी किटची सर्व्हिसिंग करावी लागते.
४) सीएनजी लिकेज होण्याची शक्यता असते. यामुळे नेहमी सीएनजी किटमधील व्हॉल्व्हची तपासणी करावी.
५) पंपावर सीएनजी भरताना कारमध्ये कोणीच बसू नये.