बीड बायपासवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 01:25 AM2018-09-03T01:25:11+5:302018-09-03T01:25:43+5:30

बीड बायपासवर एक महिन्यात पाच जणांचे बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारपासून सकाळी आणि सायंकाळी जडवाहनांना प्रवेशबंदी करण्याचा प्रयोग पहिल्याच दिवशी फसला. वाहतूक पोलिसांनी जडवाहतूक रोखल्याने दोन्ही बाजूंनी बीड बायपासवर मालवाहू ट्रक, हायवासह अन्य जडवाहनांच्या सात ते आठ किलो मिटरपर्यंत रांगा लागल्या.

The unprecedented traffic congestion on Beed Bypass | बीड बायपासवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी

बीड बायपासवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बीड बायपासवर एक महिन्यात पाच जणांचे बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारपासून सकाळी आणि सायंकाळी जडवाहनांना प्रवेशबंदी करण्याचा प्रयोग पहिल्याच दिवशी फसला. वाहतूक पोलिसांनी जडवाहतूक रोखल्याने दोन्ही बाजूंनी बीड बायपासवर मालवाहू ट्रक, हायवासह अन्य जडवाहनांच्या सात ते आठ किलो मिटरपर्यंत रांगा लागल्या.
शहराची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना रोडवर सकाळी ७ ते रात्री ११ या कालावधीत जडवाहनांना प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे. यामुळे जडवाहने कालपर्यंत बीड बायपास रस्त्याचा वापर करीत होते. बीड बायपासवर महिनाभरात पाच जणांचे अपघातात बळी गेले. सततच्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी बायपासवरील जडवाहनांना सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या कालावधीत प्रवेशबंदी करण्याचा ़निर्णय कालच पोलीस आयुक्तांनी घेतला. प्रायोगिक तत्त्वावर ९ सप्टेंबरपर्यंत हा आदेश पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी जारी केली. जडवाहनांना सकाळी आणि सायंकाळी प्रवेशबंदी करण्याच्या निर्णयाचा रविवारी पहिला दिवस होता. पोलीस आयुक्तांच्या अधिसूचनेत जालना, बीडकडून येणा-या जडवाहनांना पाचोड-पैठण लिंकरोड किंवा केम्ब्रिज चौक-सावंगी बायपास- फुलंब्री-खुलताबाद-कसाबखेडा या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले. नाशिक आणि धुळ्याकडे येणा-या-जाणा-या जडवाहनांना पैठण लिंकरोड, पाचोड मार्गाचा पर्याय सुचविण्यात आला. एक तर तीन तास एकाच ठिकाणी उभे राहणे; अथवा सुमारे चाळीस ते पन्नास कि.मी. लांबीच्या पर्यायी मार्गाचा वापर करणे, असे दोन पर्याय ट्रक, हायवाचालकासमोर होते. यामुळे दुस-या पर्यायाचा वापर केल्यास अतिरिक्त इंधन खर्च होऊन ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. यामुळे जडवाहनचालकांनी रविवारी सकाळी आणि सायंकाळी त्यांचे वाहन आहे तेथे उभे केले. परिणामी, सकाळी ८ ते ११ या वेळेत एकही जडवाहन बीड बायपासने मार्गक्रमण करू शकले नाही. सकाळी ८ ते रात्री ११ या कालावधीत बीड बायपास ते केम्ब्रिज चौकाच्या पुढे आणि बीड रोडवर सुमारे दोन ते अडीच हजार ट्रक, हायवांच्या रांगा लागल्या. तसेच लिंक रोड ते पैठण रोड आणि ए.एस. क्लबच्या पुढे चार ते पाच किमी वाहने उभी होती.
स्पीड गण गायब,
वेगावर नियंत्रण नाही
बीड बायपास रस्त्यावरील अपघातांमध्ये बºयाचदा वाहनांचा वेग कारणीभूत असल्याचे समोर आले. सुसाट वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी बायपासवर स्पीड गण बसविले होते. मात्र, वर्षभरात स्पीड गण नादुरुस्त झाल्याने बायपासवरून ही यंत्रणा गायब झाली. शिवाय आजपर्यंतच्या अपघातांना वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणे हे महत्त्वाचे कारण असल्याचे अधिका-यांनी नमूद केले.
सर्व्हिस रोड बांधणे गरजेचे
बीड बायपास रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नागरी वसाहती अस्तित्वात आल्या. या वसाहतींमुळे बायपास आता शहरातील मार्ग झाला. या मार्गाला सर्व्हिस रोडची आवश्यकता आहे. सर्व्हिस रस्ता बांधल्यास या मार्गावरील अपघात रोखण्यास मदत हाईल, असे वारंवार सांगितले जाते. मात्र, राजकीय इच्छाशक्तीअभावी बायपासवरील सर्व्हिस रोड होत नाही.
केवळ एकच लेन वाहतुकीसाठी मोकळी
वाहनचालकांना बायपासवरील जडवाहनांना प्रवेशबंदीची माहिती नव्हती. यामुळे नेहमीप्रमाणे बायपासने निघालेल्या जडवाहनांना अचानक आहे तेथे थांबण्यास सांगितल्याने बायपासवरील एक लेन जडवाहनांनी व्यापली होती. परिणामी, एकच लेन वाहतुकीसाठी मोकळी होती.

Web Title: The unprecedented traffic congestion on Beed Bypass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.