उत्कर्ष पॅनलचे पदवीधर गटात निर्विवाद वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 11:47 PM2017-12-08T23:47:37+5:302017-12-08T23:47:40+5:30
: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पदवीधर अधिसभेच्या गटात मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या उत्कर्ष पॅनलने सर्वच सर्व जागा मोठ्या फरकाने जिंकल्या आहेत. ‘अभाविप’प्रणीत विद्यापीठ विकास मंच, युवा सेना व भाविसे प्रणीत शिवशाहीसह इतर पॅनलचा दणदणीत पराभव केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पदवीधर अधिसभेच्या गटात मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या उत्कर्ष पॅनलने सर्वच सर्व जागा मोठ्या फरकाने जिंकल्या आहेत. ‘अभाविप’प्रणीत विद्यापीठ विकास मंच, युवा सेना व भाविसे प्रणीत शिवशाहीसह इतर पॅनलचा दणदणीत पराभव केला.
विद्यापीठाच्या अधिसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत ‘अभाविप’प्रणीत विद्यापीठ विकास मंचने एकूण ३७ पैकी ७ जागा जिंकल्यानंतर पदवीधर गटामध्ये वातावरण निर्मिती केली होती. यामुळे पदवीधर गटातील निवडणूक चुरशीची होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र ही निवडणूक एकतर्फीच झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वात उत्कर्ष पॅनलतर्फे ही निवडणूक लढविण्यात आली.
यामध्ये १० पैकी ५ राखीव प्रवर्गातील जागांचे निकाल सकाळी सहा वाजेपर्यंत घोषित झाले होते. यात सर्वच जागी उत्कर्षच्या उमेदवारांनी प्रतिस्पर्धी विद्यापीठ विकास मंचच्या उमेदवारांवर तब्बल सरासरी ६ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला. तर खुल्या प्रवर्गातील ५ जागांची मतमोजणी सकाळी सात वाजता सुरू झाली. पहिल्या पसंतीमध्ये कोणत्याही उमेदवाराने ठरवून दिलेला कोटा पूर्ण केला नसल्यामुळे द्वितीय पसंतीचे मत मोजण्यास सुरुवात केली. मात्र, या गटातही उत्कर्ष पॅनलचेच उमेदवार आघाडीवर आहेत.
यातील पहिल्या सहामध्ये सर्वच उमेदवार उत्कर्ष पॅनलचे असल्यामुळे मध्यरात्रीपर्यंत या खुल्या जागांवर उत्कर्षचेच उमेदवार बाजी मारण्याची शक्यता आहे.
खुल्या प्रवर्गात उत्कर्षची आघाडी
खुल्या प्रवर्गातील ५ जागांसाठी सर्वाधिक चुरस होती. एकूण ३३ उमेदवारांनी आपले नशीब अजमावले. यात उत्कर्षतर्फे निवडणूक लढविलेल्या ६ उमेदवारांनी सर्वाधिक पहिल्या पसंतीची मते मिळवून विजयी आघाडी घेतली आहे. या प्रवर्गात विजयासाठी २,४५४ मतांचा कोटा ठरला होता. मात्र एकही उमेदवार पहिल्या फेरीत हा कोटा पूर्ण करू शकला नाही. पहिल्या पसंतीमध्ये उत्कर्षचे डॉ. नरेंद्र काळे २,२३०, डॉ. भारत खैरनार १,९३६, प्रा. रमेश भुतेकर १,४७७, शेख झहूर खालीद १,४७६, प्रा. संभाजी भोसले १,३२०, पंडित तुपे ९३० मते घेऊन आघाडीवर आहेत. यातील पहिले पाच उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. तर विद्यापीठ विकास मंचचे उमेदवार शेख कलीम जहांगीर ८०५, डॉ. उल्हास उढाण ७३८, डॉ. तुकाराम सराफ यांना ४१९ मते पहिल्या पसंतीमध्ये मिळाली आहेत.
राखीव प्रवर्गातील विजयी उमेदवार
पदवीधर अधिसभेत अनुसूचित जाती संवर्गात उत्कर्षचे उमेदवार प्रा. सुनील मगरे यांनी ७,२२३ मतांचा कोटा पूर्ण करून ८,५०४ मते घेऊन विजय मिळविला. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार पंकज भारसाखळे यांना अवघी १९०४ मते पडली.
अनुसूचित जमाती संवर्गात उत्कर्षचे सुनील निकम यांनी ९,४२१ मते घेऊन दणदणीत विजय मिळविला. त्यांचे प्रतिस्पर्धी राजू सूर्यवंशी यांना २,८३६ मते मिळाली. व्हीजेएनटी संवर्गात उत्कर्षचे संजय काळबांडे यांनी ८,०४१ मते मिळवून प्रतिस्पर्धी काकासाहेब शिंदे यांचा पराभव केला. ओबीसी संवर्गात अॅड. सुभाष राऊत यांनी ८,९२३ मते घेऊन प्रतिस्पर्धी राजीव काळे यांचा पराभव केला. तर महिला राखीव गटात उत्कर्षच्या उमेदवार शीतल माने यांनी ७,४०७ मते घेऊन मंचच्या उमेदवार योगिता तौर यांचा पराभव केला. विशेष म्हणजे उत्कर्षच्या राखीव संवर्गातील सर्वच उमेदवारांनी ठरविलेला कोटा पूर्ण करून अधिक मते मिळविली आहेत.
विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत उत्कर्षतर्फे सर्व जाती, धर्म, पंथातील सदस्यांना समान प्रतिनिधित्व दिले. खुल्या गटातही मुस्लिम, ओबीसी समाजातील व्यक्तींना उमेदवारी दिली. यामुळे विद्यापीठाच्या विकासाची जबाबदारी पुन्हा एकदा उत्कर्षच्या खांद्यावर मतदारांनी टाकली आहे. मतदारांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सर्वच उमेदवार प्रयत्न करतील हे नक्की.
- सतीश चव्हाण, आमदार
बाद मतांचा आकडा
तीन हजारांवर
पदवीधर गटामध्ये तब्बल बाद मतांचा आकडा तीन हजारांपेक्षा अधिक गेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गात २,४६५ मते बाद झाली. यातील बहुतांश मतपत्रिकेवर कोणत्याही उमेदवाराला पसंतीक्रम दिलेला नव्हता. अनुसूचित जमातीमध्ये २,९९७ मते बाद ठरली. व्हीजेएनटीत ३,०५२, ओबीसीत २,९००, महिला गटात २,८६९ आणि खुल्या गटात २,१९२ मते बाद ठरली आहेत.