अवकाळी पावसाने वार्षिक धान्य खरेदी मंदावली, ग्राहकांचे ' वेट अँड वॉच'
By प्रशांत तेलवाडकर | Published: May 2, 2024 07:25 PM2024-05-02T19:25:34+5:302024-05-02T19:25:52+5:30
नवीन धान्यास उन्ह दाखवावे लागते मात्र अवकाळी पाऊस कधी येईल याचा अंदाज नसल्याने ग्राहक सध्या खरेदीस थांबले आहेत
छत्रपती संभाजीनगर : ढगांच्या कडकडाटसह अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. अशा वातावरणात धान्य वाळविता येत नाही. यामुळे वार्षिक धान्य खरेदी करणाऱ्यांनी ‘थांबा व वाट पहा’ अशी भूमिका घेतल्याने जाधववाडी कृउबा व जुन्या मोंढ्यातील उलाढालीला ‘ब्रेक’ लागला आहे.
गहू, ज्वारीला दाखवावे लागते कडक ऊन
नवीन गहू व ज्वारी खरेदी केल्यानंतर त्यास कडक उन्हात ठेवावे लागते. त्यामुळे धान्यातील ओलसरपणा निघून जातो व मग वर्षभर त्या धान्याला कीड लागत नाही. यामुळे मार्च, एप्रिल व मे महिन्यात वार्षिक धान्य खरेदी केली जाते. मात्र, मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. अवकाळी पाऊस कधी येईल याचा अंदाज नसल्याने धान्य वाळत टाकले व ते पावसात भिजले तर खराब होण्याची व नंतर किड लागण्याची दाट शक्यता असते.
गहू, ज्वारीचे भाव वधारले
अवकाळी पावसाचा फटका महाराष्ट्रच नव्हे तर राजस्थान, गुजरात राज्यातही बसला आहे. यामुळे धान्याची आवक थंडावली आहे. अनेक भागांत शेतात पीकांचे नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम धान्याच्या भाववाढीवर झाला आहे. मागील आठवडाभरात गव्हात क्विंटलमागे १०० ते १२० रुपयांनी वाढ होऊन ३००० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत आहे. ज्वारीही २०० ते ३०० रुपयांनी वधारुन ३५०० ते ४५०० रुपये क्विंटल विकली जात आहे.
-निलेश सोमाणी,व्यापारी
आवश्यकतेनुसार धान्य खरेदी
मागील दोन वर्षे अवकाळी पाऊस व नंतर पावसाळ्यात शेवटच्या टप्यात झालेल्या मुसळधार पावसाने धान्यात ओलावा निर्माण होऊन गहू व ज्वारीला किडे लागले होते. वार्षिक धान्य साठवून ठेवणाऱ्या ग्राहकांना याचा फटका बसला होता. त्यामुळे यंदा वार्षिक धान्य खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच महिन्याला आवश्यकतेनुसार धान्य खरेदी करणे पसंत केले असल्याने वार्षिक धान्याच्या उलाढालीवर मोठा परिणाम झाला असल्याचे व्यापाऱ्यांनी नमूद केले.