जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा
By Admin | Published: May 14, 2017 02:14 AM2017-05-14T02:14:51+5:302017-05-14T02:14:51+5:30
महाड तालुक्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली
लोकमत न्यूज नेटवर्क
बिरवाडी : महाड तालुक्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून, महाड एमआयडीसीलगत असणाऱ्या धामणे, जिते, टेमघर, शेलटोली या गावांना शुक्रवारी रात्री ८ वाजता पावसाचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसला आहे. धामणे गावातील लक्ष्मण विठ्ठल खराडे याच्या घराचे पत्रे उडून गेले, तसेच वीजमीटरची मोडतोड झाली.
शेलटोली सजाचे तलाठी एस. एम. चाटे यांनी केलेल्या पंचनाम्यानुसार खराडे यांच्या घराचे वादळी पावसामुळे १ लाख १३ हजार ६५० रु पयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच धामणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रिया अशोक चिकणे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष पवार, माजी सरपंच शेखर राखाडे यांनी या नुकसानीचा पंचनामा महसूल विभागाचे तलाठी एस. एम. चाटे यांच्या मार्फत करून घेतला. तर जिते येथील शोभा रमेश मोहिते यांचे घर या वादळी पावसात पडल्याने ३२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच शेलटोली येथील शेतकरी मनोहर मारु ती गायकवाड यांच्या वाड्याची भिंत कोसळून गाईचा मृत्यू झाल्याने २१ हजार रु पयांचे नुकसान झल्याची माहिती तलाठी एस. एम. चाटे यांनी दिली आहे. तालुक्यातील अन्य ठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे तहसीलदार सचिन गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत.
वादळी पावसामुळे टेमघर, जिते परिसरातील वीज खांब कोलमडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. महावितरण मार्फत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे व खांब उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
आंबा पिकाचे नुकसान; शेतकरी चिंतातूर
म्हसळा : पावसाने नागरिकांसह व्यापारी, वीजभट्टीचालकांची तारांबळ उडाली. शुक्रवारी रात्री काही परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.
ऐन बहारात आलेल्या आंबा पिकाचे अवकाळीमुळे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. तालुक्यात सर्वत्र आंबा पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाईची मागणी होऊ लागली आहे.
म्हसळा येथील जुन्या सरकारी दवाखान्याशेजारील कर्मचारी निवासस्थान, तसेच पंचायत समिती येथे पावसामुळे झाड तारेवर पडून विजेचा खांब कोसळला.
पावसाच्या शिडकाव्याने आंबे काढणीला वेग
रेवदंडा : अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान होऊ नये, म्हणून शनिवारी सकाळपासून आंबे काढून घेण्यासाठी पाडेकरी वर्गाला घेऊन आंबे उतरवण्याची लगबग जाणवत आहे. उतरवलेले आंबे विक्र ीसाठी पाठवण्याची तयारी एकीकडे दिसत असून, पुन्हा एकदा आंबा बागायतदारांकडून खोके, करंड्या, पेपर रद्दी, सुतळ यांना मागणी वाढली आहे. आंब्याचे दर अद्याप भडकलेलेच असल्याने सर्वसामान्यांनी आंबा खरेदीकडे पाठ फिरवली आहे.
मुरु डमध्ये आंबा बागायतदार, वीटभट्टीचालकांचे नुकसान
आगरदांडा : उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना शुक्रवारी सुटलेल्या सोसाट्याचा वारा आणि पावसाने काहीसा दिलासा दिला.
गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाल्याने नागरिक गर्मीने हैराण होते. वादळी वाऱ्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी वीजखांब पडले, तर काही ठिकाणी वीज वाहिन्या पडल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागले.
लहान मुलांनी पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला. अचानक आलेल्या पावसाने वीटभट्टीचालकांचे नुकसान झाले. तसेच आंबा बागायतदारांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले.
बोर्लीत तब्बल १३ तासांनी वीज पूर्ववत
बोर्ली मांडला : बोर्ली मांडला विभागामध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी शुक्रवारी बरसल्या. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. तो तब्बल १३ तासांनी म्हणजेच शनिवारी सकाळी पूर्ववत करण्यात महावितरणला यश आहे.
पाऊस आला असला तरी वीज नसल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला. काशीद तसेच काही ठिकाणी वृक्ष कोसळल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली होती.