शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका; काढणीला आलेल्या रब्बी पिकांसह फळबागांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 02:52 PM2022-03-09T14:52:12+5:302022-03-09T14:53:11+5:30
काढणीला आलेली ज्वारी आणि सुर्यफुल, कांदा पिकांना अवकाळीचा मोठा फटका बसला आहे.
सोयगाव/सिल्लोड : औरंगाबाद जिल्ह्याला मंगळवारी मध्यरात्री आणि बुधवारी पहाटे अवकाळी पावसाने तडाखा दिला. अचानक वादळीवाऱ्यासह झालेल्या माध्यम स्वरूपाच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेले रब्बी पिके आणि फळबागांना याचा फटका बसला आहे.
सोयगावसह तालुक्यात पहाटे दोन वाजेपासून सुरू असलेल्या अवकाळीच्या रिपरिपीमुळे रब्बीसह फळबागांचे नुकसान झाले. अचानक झालेल्या अवकाळी पावसाचा काही भागात जोर अधिक होता. त्यामुळे रब्बी पिके आडवी पडली आहेत. काढणीला आलेली ज्वारी आणि सुर्यफुल, कांदा पिकांना अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. बनोटी भागात अवकाळी पावसाची रिपरिप बुधवारी दुपारी उशिरापर्यंत सुरूच होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. दरम्यान, तहसीलदार रमेश जसवंत यांनी तातडीने महसूल यंत्रणेला गावनिहाय नुकसानीचा अहवाल तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच सिल्लोड तालुक्यात मंगळवारी रात्री अचानक विजेच्या कडकडाटात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. बुधवारी दुपारपर्यंत ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होता. यामुळे सोंगणीला आलेला गहू, हरभरा, सूर्यफूल, व कांदा सिडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, सरकारी दप्तरमध्ये सध्यातरी नुकसानीची नोंद नाही.
भराडी अंधारी रोडवर अवकाळी पावसामुळे उपळी जवळील रस्ता चिखलमय झाला होता यामुळे अनेक वाहने त्यात फसली होती तारेवरची कसरत करून वाहन धारकांना वाहन काढावे लागले अनेक मोटार सायकल स्वार घसरून पडले. पानवडोद खुर्द शिवारातील गट क्र 248 मधील शेतकरी गजानन दौड यांचा जवळपास २ एक्कर क्षेत्रावरील गहू आडवा झाला.याच प्रमाणे तालुक्यातील अजिंठा, शिवना, गोळेगाव, निल्लोड, भराडी, बोरगाव बाजार, आमठाणा, सिल्लोड,अंभई सर्कल मधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
तालुक्यात ६ मिलिमीटर पाऊस, तालुक्यात मंडळ निहाय झालेला पाऊस असा:-
सिल्लोड ९ ,भराडी ३,अंभई ११, अजिंठा ५, गोळेगाव बु १२,आमठाणा ४,निल्लोड २,बोरगावबाजार २ असा एकूण ४८ मिलिमीटर पाऊस झाला तर सरासरी तालुक्यात ६ मिलिमीटर पाऊस झाला आहे.