दोघांचा कारागृहातून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:04 AM2021-03-22T04:04:31+5:302021-03-22T04:04:31+5:30
औरंगाबाद : बनवाट जामीनपत्राच्या आधारे दोन कैद्यांचा कारागृहातून निसटण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अयशस्वी झाला. हे दोघे जण व त्यांना ...
औरंगाबाद : बनवाट जामीनपत्राच्या आधारे दोन कैद्यांचा कारागृहातून निसटण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अयशस्वी झाला. हे दोघे जण व त्यांना मदत करणारा एक अशा तीन कैद्यांच्या पोलीस कोठडीमध्ये २२ मार्चपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रुहिना अंजूम यांनी रविवारी दिले. उद्धव ऊर्फ उद्या मजल्या भोसले (३५, रा. रामगव्हाण, ता. अंबड, जि. जालना, ह.मु. टाकळी अंबड, ता. पैठण), आसाब दस्तगीर शेख (२२, रा. रोहतवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) आणि विशाल मिलिंद पारधे (२८, रा. त्रिवेणीनगर, सिडको एन-७) अशी आरोपींची नावे आहेत.
१ फेब्रवारी रोजी न्यायाधीन बंदी विशाल पारधे आणि बंडू राठोड या दोघांची न्यायालयात तारीख होती. दोघांची न्यायालयात रवानगी करण्यापूर्वी कारागृहाच्या मुख्यद्वारात कारागृह पोलिसांकडून त्यांची अंगझडती घेण्यात आली. तेव्हा आरोपी विशाल पारधे याच्या बेल्टच्या मध्ये एक बंद पाकीट सापडले. त्यामुळे विशाल पारधे याला कारागृह अधीक्षक यांच्या दालनात नेण्यात आले. तेथे उपाधीक्षक व इतर कर्मचाऱ्यांसमोर ते बंद पाकीट उघडण्यात आले असता, त्यात कारागृहातील बंदी तथा आरोपी आसाब शेख याचे बनावट जामीनपत्र आढळून आले. यासंदर्भात आसाब शेखकडे चौकशी करण्यात आली असता त्याने सदरील बंद पाकीट विशाल पारधे याच्या मार्फत कारागृहाच्या आवारातील जामीनपेटीत टाकण्यासाठी दिल्याची कबुली दिली.
तत्पूर्वी, २५ जानेवारी रोजी कारागृह पोलिसांनी जामीनपेटी उघडली तेव्हा त्यात उद्या भोसले याचे जामीनपत्र मिळाले. मात्र, पोलिसांना ते जामीनपत्र बनावट असल्याची शंका आली व त्याला सोडविण्यासाठी आलेल्या व्यक्तीला पकडण्यासाठी पुकारा केला. मात्र, बाहेर कोणीही आलेले नव्हते. दोन दिवसांनंतर पुन्हा जामीनपेटीत आणखी बनावट जामीनपत्र आढळून आले. ते आसाब शेख याचे होते. आसाब शेख हा विधि शाखेचा पदव्युत्तर विद्यार्थी असून त्याच्या विरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात ‘मकोका’अंतर्गत गुन्हा दाखल आहे, तर आरोपी उद्धव ऊर्फ उद्या भोसले याच्यावर देखील ‘मकोका’अंतर्गत गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या दोघांचे जामीनपत्र कारागृह पोलिसांनी बीड सत्र न्यायालयाकडे पाठवून पडताळणी केली. त्यासंदर्भात अलीकडेच बीड सत्र न्यायालयाकडून ती दोन्ही जामीनपत्रे बनावट असल्याची माहिती कारागृह पोलिसांना मिळाली.
यासंदर्भात पोलीस निरीक्षक इंगोले यांनी सांगितले की, कारागृह पोलिसांनी हर्सूल पोलीस ठाण्यात १ फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली. त्यानुसार त्या तीन कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, ते कारागृहात अन्य गुन्ह्यात न्यायाधीन बंदी असल्यामुळे विविध कोर्टांत अर्ज करून त्यांना १७ मार्च रोजी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना २१ मार्चपर्यंत कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्याने आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले होते.